मुंबई : ब्रँडेड सौंदर्य प्रसाधनांच्या वेष्टनात बनावट, भेसळयुक्त क्रीम्स आणि उत्पादनांचा समावेश करून विक्री करणा-या विक्रेते आणि उत्पादकांविरोधात एफडीएने नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे ब्युटी पार्लर, सलून्स, ट्रेनसह मुंबई शहर-उपनगरातील विविध मार्केट्समध्ये विक्री होणाºया सौंदर्य प्रसाधनांवर एफडीएची करडी नजर असणार आहे.नागपूर येथे स्थानिक स्तरांवर तयार होणारी बनावट सौंदर्य प्रसाधने ‘ब्रँडेड’च्या आवेष्टनात देऊन यांची सर्रास विक्री हे विक्रेते करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागपूर येथील पोलीस ठाण्यात औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत चार विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयाने दिली. त्यांनी सांगितले की, हे विक्रेते विविध ब्रँडेड सौंदर्य प्रसाधनाच्या रिकाम्या बाटल्या, डबे आणि बॉक्स विकत घ्यायचे. त्यात विनापरवाना सुरू असणाºया स्थानिक कारखान्यांतील सौंदर्य प्रसाधने भरून त्यांची विक्री करत होते. याशिवाय, पुणे येथीलही चार विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला. त्यातील भारत ब्युटी सेंटरमधील रोझवूड तेल आणि फिनाइल यावर कोणताही नोंदणी क्रमांक आढळून आला नाही. त्याचप्रमाणे, डोंबिवली येथील एमएम प्रोडक्ट्स, मनन डिस्ट्रिब्युशन यांच्या संपूर्ण वितरकांच्या साखळीवर छापा टाकण्यात आला आहे. या वेळी २८ लाखांचा माल जप्त करण्यात आला. विलेपार्ले येथील पेट स्टोअरमधूनही विनापरवाना सौंदर्य प्रसाधनांची विक्री करण्यात येत होती. या दुकानावरील कारवाईत १८ लाखांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.>ग्राहकांनो, सावधानता बाळगा!पार्लर, सलून्समध्ये जाणाºया ग्राहकांना आपल्याकरिता बनावट सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जात आहे, याची कल्पनाही येत नाही. इतक्या शिताफीने हे विक्रेते, उत्पादक बनावट सौंदर्य प्रसाधनांचा बाजार मांडत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.- पल्लवी दराडे,आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग
सौंदर्य प्रसाधने ‘एफडीए’च्या रडारवर, ब्रँडेडच्या नावाखाली ‘बनावट’ विक्रीचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:08 AM