मुंबई : निधीवाटपावरून उडालेल्या राजकीय भडक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान परिषदेत विरोधकांना फटकारले.
माझ्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात एकदाही निधी मिळाला नसल्याची चर्चा झाली नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडला. त्यांच्यावेळी विरोधकांना एक फुटकी कवडी निधी मिळाला नाही. तेव्हा शहाणपणा शिकवायचा तर आधीच्या सरकारला शिकवा. तुम्ही गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारू, असे होणार नाही. निधीवाटपात कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा मतदारसंघावर अन्याय होणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर पलटवार केला.
विरोधी आमदारांना योग्य प्रमाणात निधी दिला जात नाही. याबाबत त्यांच्यावर अन्याय झाला असल्याच्या, मुद्द्यावर दानवे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निधीवाटपावरील स्थगिती कायम आहे. शिंदे-फडणवीस सरकार असमान पद्धतीने निधी वाटप करीत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. निधीवाटपातील असमानतेचा मुद्दा निकाली काढा, अशी मागणी काँग्रेसचे भाई जगताप यांनी केली, तर आमचा मतदार हा बांग्लादेशचा नागरिक आहे का, असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सचिन अहिर यांनी केला.
कोरोना फक्त विरोधी पक्षासाठी होता का?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि एक नवीन पायंडा राज्यात सुरू झाला. विरोधकांना एक फुटकी कवडी निधी मिळाला नाही. तुम्ही कोविडचे कारण सांगता, पण हा कोविड फक्त विरोधी पक्षासाठी होता का, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. विरोधकांनी त्यावेळी अजित पवारच अर्थमंत्री होते, याची आठवण करून दिली असता निर्णय राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री घेत असतो त्यांच्या सहीशिवाय निर्णय होत नसतो, असे फडणवीसांनी सुनावले.
ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधी : थोरात
राज्य सरकारने मांडलेल्या ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहेत. ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांना कमी निधी देण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये असंतोष असून, निधीवाटपाचा अन्याय दूर करावा; अन्यथा न्यायालयात जावे लागेल, असा इशारा काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत दिला.