गौरी टेंबकर-कलगुटकर।मुंबई : स्वत:ला किंवा अन्य सहकाºयाला कोरोना झाल्यामुळे लक्षणे नसूनही १४ दिवस क्वारंटाइन सेंटरमध्ये राहण्याची वेळ अनेक नोकरदारांवर आली आहे. मात्र पालिकेचा हा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यावरही काही कंपन्या पुन्हा कार्यालयात रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे कोविडचा रीटेस्ट अहवाल मागत आहेत. त्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे.
काही खासगी कंपन्यांच्या कर्मचाºयांनी ‘लोकमत’कडे संपर्क केला. ते क्वारंटाइन असताना कंपनीच्या एचआर विभागाकडून त्यांना फोन आले आहेत. यात क्वारंटाइनचा कालावधी संपल्यावर त्यांनी पुन्हा कोविडची चाचणी (रीटेस्ट) करून त्याचा अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. हा अहवाल निगेटिव्ह असेल तरच त्यांनी आॅफिसला रुजू व्हावे, असेही बजावले जात आहे. मात्र क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर चाचणी करण्याची आवश्यकता नाही, तसेच पालिकाही पुन्हा अशा चाचण्या करत नाही, असे उत्तर संबंधित वॉर्डच्या आरोग्य अधिकाºयाकडून देण्यात आले आहे. मात्र पालिकेकडून देण्यात येणारे ‘डिस्चार्ज कार्ड’ही कंपन्या ग्राह्य धरत नसल्याचेही अनेक प्रकार घडत आहेत. त्यामुळे याबाबत सरकारने योग्य त्या मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी केली जात आहे.घरच्यांची काळजी कोण घेणार?माझी पत्नी आणि मुलगा गावी आहे. त्यामुळे मी माझ्या आईसोबत एसआरए इमारतीत राहतो. माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मला पालिकेने १० दिवस क्वारंटाइन केले. मात्र त्या दरम्यान माझ्या वृद्ध आईवर लक्ष देण्यासाठी कोणीच नव्हते. कोरोनामुळे शेजारीही घरी जाण्यास घाबरत होते. या सगळ्यात तिचे काही बरेवाईट होऊ नये हीच चिंता मला सतत सतावत होती, असेही एका कर्मचाºयाचे म्हणणे आहे.आम्हाला ‘रीटेस्ट’ करायची नाही, कारण... आमच्याच खिशाला भुर्दंड!‘गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही कामावर नसल्याने पगार मिळालेला नाही. त्यात आता १० ते १४ दिवस क्वारंटाइन झाल्याने ते पैसेही कापले जाणार आणि त्यात आता टेस्टचा होणारा भुर्दंड उगाचच आमच्या खिशाला पडणार आहे.पुन्हा क्वारंटाइन होण्याची भीती‘आम्हाला खासगी लॅबवर विश्वास नाही. रीटेस्ट केल्यावर जर अहवाल पॉझिटिव्ह आला तर आम्हाला पुन्हा क्वारंटाइन व्हावे लागेल. त्यामुळे कुटुंबापासून लांब होऊन विदारक स्थिती असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जाऊन राहावे लागेल, जे खरेच तणाव वाढवणारे आहे.’