मुंबई : सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने सावधगिरीचा मार्ग अवलंबला असून, २२ फेब्रुवारी रोजी आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून आल्यास लोकलबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुंबईत १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आली. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांत रुग्णसंख्येत पुन्हा वाढ दिसून येत आहे. मुंबईत जानेवारी महिन्यात दिवसाला सरासरी ३०० ते ३५० पर्यंत रुग्णांची नोंद होत होती. हा आकडा आता ६५० वर पोहोचला आहे. परिणामी, राज्यात अन्य ठिकाणी शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतरही मुंबई महापालिकेमार्फत सावध पावले टाकली जात आहेत. मुंबईच्या लोकलच्या निरीक्षणासाठी १५ दिवसांचा कालावधी ठेवला होता. हा कालावधी २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिका रुग्णसंख्येचा आढावा घेणार आहे.
याबाबत विचारले असता कोरोना रुग्णांच्या संख्येत १० - २० टक्के वाढ होत राहील. मात्र, २२ फेब्रुवारीनंतर घेतलेल्या आढाव्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ दिसल्यास लोकलबाबत वेगळा निर्णय होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून पावले उचलली जातील, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. मात्र, रुग्णसंख्या कमी असल्यास आणखी शिथिलतेबाबतही निर्णय होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.