माणुसकी हरवत चालली आहे असं आपण अनेकदा ऐकतो. काही वेळा त्याचा अनुभवही घेतो. पण माणुसकी अजूनही जिवंत असल्याची अनेक उदाहरणं देखील आपल्यासमोर येतात आणि एक नवी स्फूर्ती मिळते. मुंबईच्या ट्राफिकमध्ये माणुसकीचं दर्शन घडवणारी अशीच एक घटना समोर आली आहे. ट्राफिकमध्ये एका वृद्ध व्यक्तीला अस्वस्थ वाटत असल्याचं एका 'स्विगी बॉय'नं पाहिलं आणि त्याच्या मदतीला धावून गेला. मृणाल किरदत असं 'स्विगी'साठी काम करणाऱ्या या तरुणाचं नाव असून तो मुंबईतील सांताक्रूझ येथील रहिवासी आहे. 'स्विगी'नं संपूर्ण घटनेची माहिती इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून समोर आणली आहे.
मृणालनं ज्या वृद्ध व्यक्तीची मदत केली ते निवृत्त कर्नल असून त्यांचं नाव मोहन मलिक आहे. त्यांची तब्येत आता पूर्णपणे बरी असून त्यांनी देवदूत ठरलेल्या 'स्विगी बॉय' मृणाल किरदतचे आभार व्यक्त केले आहेत. कर्नल मोहन मलिक यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
ख्रिसमसचा दिवस होता आणि निवृत्त कर्नल मलिक यांची प्रकृती खूप चिंताजनक झाली होती. त्यांचा मुलगा कर्नल मोहन मलिक यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाला पण रस्त्यावर प्रचंड ट्राफिक होतं. त्यामुळे दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न त्यांचा मुलगा करू लागला. जेणेकरुन ट्राफिकमधून सहज वाट काढून रुग्णालयात पोहोचता येईल. पण कुणीच दुचाकीस्वार त्यांची मदत करायला तयार नव्हतं. पण मृणाल त्यांच्यासाठी देवदूतासारखा धावून आला आणि त्यानं स्वत:चं काम बाजूला ठेवून मलिक यांना मदत केली.
मृणाल यानं स्वत:च्या दुचाकीवरुन कर्नल मलिक यांना लिलावती रुग्णालयात पोहोचवलं. यावेळी ट्राफिकमधून वाट काढत, समोरील वाहनांना बाजूला होण्यासाठी मोठमोठ्यानं आरडाओरडा करुन आवाहन करत तो रुग्णालयात पोहोचला. तसंच रुग्णालयात पोहोचून त्यानं डॉक्टरांना कर्नल मलिक गंभीर असल्याचं लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीनं मलिक यांच्यावर उपचार सुरू केले. मलिक यांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांना जीवदान मिळालं आहे.
काही आठवड्यांच्या उपचारानंतर निवृत्त कर्नल मोहन मलिक ठणठणीत बरे झाले आणि त्यांनी सर्वात आधी त्यांना रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मृणाल याची विचारणा केली. तसंच त्याचे आभार व्यक्त करणारी एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. मोहन मलिक यांनी मृणाल याला 'तारणहार' अशी उपमा देत त्याचे आभार व्यक्त केले आहेत.
"माझ्यासाठी तो खरंच तारणहार आहे. कारण तो जर नसता तर आज मी माझ्या कुटुंबीयांसोबत नसतो. त्याचे आणि त्याच्यासारख्या असंख्य डिलिव्हरी बॉय नायकांचे मनापासून आभार", असंही मलिक यांनी म्हटलं आहे.