शेअर गुंतवणुकीत निवृत्त कमांडरची पावणेदोन कोटी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:41 IST2025-03-07T10:40:00+5:302025-03-07T10:41:11+5:30

याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

retired commander cheated of 1 crore 75 thousand in share investment | शेअर गुंतवणुकीत निवृत्त कमांडरची पावणेदोन कोटी फसवणूक

शेअर गुंतवणुकीत निवृत्त कमांडरची पावणेदोन कोटी फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  भारतीय वायुसेनेमधून  एअर कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या ६३ वर्षीय अधिकाऱ्याची शेअर्स गुंतवणुकीच्या नावे पावणेदोन कोटींना फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात बुधवारी सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

तक्रारदार सध्या आर्यन एव्हिऐशन या कंपनीसाठी कमर्शिअल पायलट म्हणून काम करतात. त्यांना काही दिवसांपूर्वी व्हॉटसॲपवर पॉइंट ब्री ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. त्यांनी या कंपनीची माहिती घेताच प्रत्यक्षात त्या नावाची कंपनी दिसून आली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत त्यांना पॉइंट ब्रे ॲप इन्स्टॉल करण्यास भाग पाडले. त्यांनी त्यात माहिती भरताच, ग्रुपमध्ये येणाऱ्या शेअर्सच्या टिप्सनुसार शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. तसेच ग्राहक सेवा प्रतिनिधीकडून विविध बँक खात्यांची माहिती व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येत होती. 

त्यानुसार, त्यांनी पावणे दोन कोटी रुपये गुंतवले. गुंतवणुकीवर आठ कोटी नफा दाखवत  होता. त्यांनी नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रक्कम निघाली नाही.  

गारमेंट व्यावसायिकाला सव्वा कोटींना गंडवले 

पवईतील गारमेंट  व्यावसायिक पंकज अग्रवाल (५२) यांची अशाच प्रकारे या टोळीने सव्वा कोटींना फसवणूक केली आहे. ८ जानेवारी ते आतापर्यंत ही याच टोळीने १ कोटी ३८ लाखांचा चुना लावला आहे. पैशांची मागणी करताच त्यांनी व्हॉटसॲप ग्रुपदेखील अचानक बंद झाला. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, मंगळवारी गुन्हा नोंदवत पश्चिम विभाग सायबर पोलिस तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने तपास करत आहे. 

आजोबांनी दहा कोटींच्या लोनसाठी जमापुंजी गमावली 

अंधेरीतील रहिवासी असलेले ७० वर्षीय अजय गुप्ता यांना बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचा बनाव करत कमी व्याजावर १० कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सायबर भामट्याने त्यांना जाळ्यात ओढून वेगवेगळी कारणे पुढे करत  कोटी १४ लाख रुपये उकळले. २९ ऑकटोबर २०२३ ते २ सप्टेंबर २०२३ दरम्यान ही फसवणूक झाली. अखेर याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाण्यात गेल्या आठवड्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

 

Web Title: retired commander cheated of 1 crore 75 thousand in share investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.