Join us  

फेब्रुवारीत निवृत्त, मे मध्ये पुन्हा नियुक्त; आरोग्य हमी सोसायटीवर पुन्हा माजी अधिकारी

By संतोष आंधळे | Published: May 20, 2023 1:31 PM

अवघ्या अडीच महिन्यांत पुन्हा त्यांना त्याच पदावर कंत्राटी तत्त्वावर वर्षभरासाठी नियुक्त करण्यात आले आहे, हे विशेष.

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पुन्हा शिवानंद टाकसाळे यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातच टाकसाळे या पदावरून निवृत्त झाले होते. मात्र, अवघ्या अडीच महिन्यांत पुन्हा त्यांना त्याच पदावर कंत्राटी तत्त्वावर वर्षभरासाठी नियुक्त करण्यात आले आहे, हे विशेष.

२१ एप्रिल रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटी पदनिर्मिती या शीर्षकाखाली शासन निर्णय घेण्यात आला होता. त्यात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य या योजनेवर प्रमुख म्हणून निवृत्त प्रशासकीय अधिकारीही काम करू शकणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. २६ एप्रिल रोजी लोकमतने, ‘ निवृत्त प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो सीईओ’ या शीर्षकाखाली यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले होते. तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीवरील नियुक्तीच्या निकषात बदल असेही त्यात नमूद होते. 

आयएएस असलेले शिवानंद टाकसाळे गेली काही महिने आरोग्य हमी सोसायटीवर मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांचा अनुभवाचा व कार्यक्षमतेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे १७ मे रोजीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

महात्मा फुले जन आरोग्य योजना काय?राज्यात १००० पेक्षा अधिक खासगी शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना राबविली जाते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना चांगले उपचार मिळावेत या उद्देशाने शासनाने २ जुलै २०१२ रोजी ही योजना सुरू केली. आता ही योजना राज्यभर राबविण्यात येत आहे. आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आयएएस परंतु सहसचिवापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाकडून प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतूद आहे.

टॅग्स :आरोग्यसरकार