निवृत्त महानिरीक्षक खोपडे यांचा पोलीस मुख्यालयात ठिय्या, आरएसएसच्या कवायतीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:32 AM2020-10-29T02:32:51+5:302020-10-29T02:33:43+5:30
Police News : दोन वर्षांपूर्वी नागपूरमध्ये दिलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने ते एका सहकाऱ्यासमवेत २३ ऑक्टोबरला मुख्यालयात पोहोचले. मात्र त्यांना डीजी नसल्याचे सांगून महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांच्याशी भेटण्यास सांगितले.
- जमीर काझी
मुंबई : पोलीस खात्यातील वर्चस्ववादी प्रवृत्तीकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देताना ज्यांनी आयुष्याची ३०-३५ वर्षे प्रमाणिकपणे सेवा बजाविली. त्याच एका निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षकाने एका सामाजिक विषयावरून दिलेल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसल्याने पोलीस मुख्यालयात अभिनव ठिय्या आंदोलन केले.
मात्र प्रशासनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. केवळ आश्वासनाची बोळवण करीत त्यांना तेथून हुसकावून लावले. सत्तरीतील निवृत्त आयजी सुरेश खोपडे यांच्या बाबतीत शुक्रवारी महासंचालक कार्यालयात हा प्रकार घडला.
दोन वर्षांपूर्वी नागपूरमध्ये दिलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने ते एका सहकाऱ्यासमवेत २३ ऑक्टोबरला मुख्यालयात पोहोचले. मात्र त्यांना डीजी नसल्याचे सांगून महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सुहास वारके यांच्याशी भेटण्यास सांगितले.
मात्र त्यांनी आपल्याला जर ते अमान्य असले तर न्यायालयाद्वारे दाद मागण्याची सूचना दिली. खोपडे व त्याच्या समवेतचे विकास लवाडे यांनी मग वरिष्ठ अधिकारी कशासाठी आहेत, असे सांगत तेथून महासंचालकांच्या केबिनकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तासाठी असलेल्या अधिकाऱ्यांनी कडे करून त्यांना अडविले. या प्रकाराने मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
काय आहे तक्रार?
दोन वर्षांपूर्वी १८ ऑक्टोबरला नागपूरमध्ये आरएसएसने शस्त्र कवायत केली. त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आदी सहभागी होते. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत खोपडे यांनी तक्रार दिली. मात्र तत्कालीन वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रभारी अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला नाही आणि तो गुन्हा होत नसल्याचे खोपडे यांना कळविले.