शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या निवृत्त मदन शर्मांनी घेतली राज्यपालांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:32 PM2020-09-15T13:32:33+5:302020-09-15T13:33:43+5:30
शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर, उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही मदन शर्मा यांनी केली होती.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेले नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांनी यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर त्यांनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मा म्हटले होते. त्यानंतर, आज शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर, उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही मदन शर्मा यांनी केली होती. मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,' असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर, आज राजभवन येथे जाऊन मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.
Maharashtra: Madan Sharma, retired Navy officer who was beaten up allegedly by Shiv Sena workers in Mumbai, met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan today. pic.twitter.com/wYRMzR7uhS
— ANI (@ANI) September 15, 2020
मदन शर्मा आणि कंगना राणौत यांची बाजू घेत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, कंगनावरील कारवाई ही दबावतंत्र असल्याचे सांगत संबंधित बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आठवलेंनी केली होती. विशेष, म्हणजे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांचीही आठवलेंनी घरी जाऊन भेट घेतली होती. कंगना राणौतनेही राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता मदन शर्मा यांनी राज्यापालांची भेट घेत, आपले गाऱ्हाणे मांडले आहे..
संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा
नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत,' असं राजनाथ सिंह म्हणाले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील एक कथित व्यंगचित्र शेअर केल्याबद्दल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण झाली. यानंतर मदन यांच्या कन्या शीला शर्मा यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. एक मेसेज फॉरवर्ड केल्यानं माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. त्यानंतर काही शिवसैनिकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला, असं शीला यांनी सांगितलं.