Join us

म्हाडाच्या कार्यालयात निवृत्त पोलिसाला मारहाण; खेरवाडी पोलिसांत १२ जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:45 IST

याप्रकरणी म्हाडा उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह १२ जणांविरोधात खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : वांद्रेच्या   म्हाडा कार्यालयातील दालनात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला डांबून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हाडा उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह १२ जणांविरोधात खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार विजय चाळके (६०) हे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक असून अंधेरीत अंबोली व्हिलेज परिसरात राहतात. त्यांची मंगलमूर्ती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील इमारत पुनर्विकासासाठी गेली आहे. त्या बदल्यात त्यांना म्हाडाकडून २०१६ पर्यंत २० महिने भाडे दिले गेले. त्यानंतर भाडे न मिळाल्याने त्यांनी म्हाडा कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चाळके अन्य दोन सदस्यांसह म्हाडा उपाध्यक्ष जयस्वाल यांना भेटायला गेले.

तेव्हा जवळपास ५ वाजता सुरक्षारक्षकांनी चाळके व त्याच्यासोबत असलेल्यांना व्हिजिटर रूममध्ये बसवले. त्यानंतर जयस्वाल आले. त्यावेळी जयस्वाल यांनी चाळकेंच्या चापट मारली. त्यानंतर तेथे १० ते १२ सुरक्षारक्षक आणि कर्मचारी जमा झाले. त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप चाळके यांनी केला. याप्रकरणी चाळके आणि जयस्वाल यांच्यासह बारा जणांवर क्रॉस गुन्हे दाखल झाले आहेत. 

तथ्य पडताळणी सुरूआम्ही या प्रकरणातील तथ्य पडताळून पाहत आहोत, असे खेरवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविदास जांभळे यांनी सांगितले. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसम्हाडा