मुंबई - वांद्रे पश्चिम परिसरात एका रिटायर्ड प्रोफेसरला ॲमेझॉन मधून बोलत असल्याचे सांगत भामट्याने दोन लाखांचा गंडा घातला. ॲमेझॉन या शॉपिंग ॲप वरून त्यांनी लॅम्प ऑर्डर केला होता जो खराब अवस्थेत मिळाल्याने तो परत करण्यासाठीची प्रक्रिया करताना हा प्रकार घडला. या विरोधात त्यांनी वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार प्रबुद्ध गांगुली (७५) हे वांद्रे पश्चिमच्या रिबेलो हाऊस मध्ये राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार ३ मार्च रोजी त्यांनी सदर लॅब ऑनलाईन ऑर्डर केला होता ज्याची डिलिव्हरी त्यांना ८ मार्च रोजी मिळाली. मात्र तो लॅम्प खराब असल्याने ती ऑर्डर रिटर्न करण्यासाठी त्यांनी ॲमेझॉनला मेसेज केला आणि ती परत घेण्याबाबत ॲमेझॉनकडून रिप्लाय ही दिला गेला. त्यानंतर ९ मार्च रोजी ५.५८ रोजी गांगुली यांनी ॲमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन कॉल बॅक साठी रजिस्ट्रेशन केले आणि त्यांना एका एका व्यक्तीने फोन करत रिटर्न पॉलिसी बाबत माहिती देत आज लॅम्प रिटर्न होऊन तुमचे पैसे रिफंड मिळतील असे सांगितले.
त्यानंतर त्यांना पुन्हा एका अनोळखी व्यक्तीने काही वेळाने फोन करत तो ॲमेझॉनच्या कस्टमर सर्विस मधून बोलत असल्याचे सांगितले. मात्र तिसऱ्यांदा त्यांना एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यावर असलेल्या कॉलरने तुमचे पैसे रिफंड होत नसून तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर द्या असे सांगत व्हाट्सअपवर एक पेज पाठवत त्यावर त्यांचे बँक डिटेल्स भरायला लावले. गांगुली यांनी जशा डिटेल भरल्या तशा त्यांच्या बँक खात्यातून पाच व्यवहार होत एकूण २ लाख रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात धाव घेतली.