राज्य सरकारने मदत करावी; कर्मचारी संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळातील अंदाजे सहा हजार पाचशे कर्मचारी व अधिकाऱ्यांची सन २०१९ पासून निवृत्तीनंतर मिळणारी शिल्लक रजेची रक्कम तसेच त्यांच्या वेतनवाढीच्या फरकाच्या ४८ हप्त्यांपैकी शिल्लक राहिलेली रक्कम असे अंदाजे १६० कोटी रुपये महामंडळाकडे थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याने सदरची रक्कम सदर कर्मचाऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारकडून निव्वळ निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी एसटी महामंडळास तात्काळ शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, निवृत्त सहा हजार पाचशे कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी, अंदाजे ५१ कर्मचारी व अधिकारी मृत्यू पावल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. निवृत्तीनंतरची सर्व देणी तात्काळ देण्याचे परिपत्रक असताना महामंडळात निवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांची थकीत देणी मिळालेली नाहीत, हे अन्यायकारक असून मुळात इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कमही कमी मिळते. त्यातही रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत व अजूनही काही जण उपचार घेत आहेत. त्यांना औषधाेपचारांसाठी तसेच उपचारासाठीही सदरची रक्कम कामी आलेली नाही. त्यामुळे याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून सदरची देणी तात्काळ मिळवीत यासाठी राज्य सरकारकडून निव्वळ निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी एसटी महामंडळास तात्काळ शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
.........................................