मुंबई : कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला सर्व स्तरातून आर्थिक मदत पुरविली जात आहे. अनेक कर्मचारी, कर्मचारी संघटना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करत आहेत. यासह सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत खारीचा वाटा दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे अनेक सेलेब्रिटी, कर्मचारी, सामान्य नागरिकांनी मदत केली. अशाचप्रकारची मदत मुंबई येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी सत्यवान रहाटे केली आहे. तीन महिन्याच्या पेन्शनची जमा असलेली दहा हजार रुपये रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली.
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात सांख्यिकी शाखा येथे वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत होते. सप्टेंबर २०१७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना दर महिन्याला ३ हजार २०० रुपये पेंशन मिळते. रहाटे यांना मिळत असलेली तीन महिन्याच्या पेंशनची जमा असलेली रक्कम १० हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. याबाबतचा धनादेश त्यांनी नुकताच बँकेत जमा केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध एसटी कामगार संघटनेकडून त्यांचे कौतुक होत आहेत.