मुंबई : कर्जाच्या बोजामुळे कर्मचाऱ्यांना दर महिन्याचे वेतन वेळेवर देण्यास हतबल ठरलेल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने (एमटीएनएल) स्वेच्छानिवृत्तीची योजना कर्मचाऱ्यांना दिली. एकीकडे स्वेच्छानिवृत्ती योजना राबवल्यानंतर दैनंदिन कामकाज करण्यास येत असलेल्या अडथळ्यांमुळे कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. तर नव्याने घेण्यात आलेल्या कर्मचाºयांना दैनंदिन कामाचा अनुभव येईपर्यंत काही निवृत्त कर्मचाºयांनी विनामूल्य काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
कर्मचारी व अधिकाºयांकडून स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज भरून घेताना निवृत्ती वेतन मिळणार असल्याने कोणत्याही सरकारी आस्थापनांमध्ये काम करता येणार नाही, असे लिहून घेण्यात आले आहे. मात्र कंत्राटी प्रक्रियेत बीएसएनएल, एमटीएनएल कर्मचाºयांची नियुक्ती केली जाईल, असे ठरविल्याने स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जातील अटींचा भंग होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कंत्राटी कामगारांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना दैनंदिन कामाचा अनुभव मिळेपर्यंत स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचारी व अधिकाºयांनी विनामूल्य तत्त्वावर काही दिवस काम करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याला काही कर्मचाºयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तर, काही जणांकडून विरोध केला जात आहे. दोन महिन्यांचे वेतन अद्याप प्रलंबित असताना व एक्स ग्रेशियासहित इतर देणी मिळण्यास विलंब होणार असताना विनामूल्य काम केल्याने कर्मचाºयांना पैशांची जास्त गरज नाही असा चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. त्यामुळे देणी मिळण्यास आणखी विलंब लागू शकतो, याकडे काही कर्मचाºयांनी लक्ष वेधले.तक्रारीत झाली वाढ!एमटीएनएलमधील कर्मचारी व अधिकाºयांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे कार्यालयांमध्ये कर्मचारी व अधिकाºयांची कमतरता निर्माण झाली असून त्याचा फटका कामावर होत आहे. त्यामुळे एमटीएनएल सेवेबाबतच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.