लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : निवृत्त शिक्षिकेला १६०० रुपयांसाठी २० हजार रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑपेरा हाऊस परिसरात ३५ वर्षीय तक्रारदार वकील कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. त्यांचे वडील भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले असून आई निवृत्त शिक्षिका आहे. ५ एप्रिल रोजी त्यांच्या आईने फेसबुकवरून लहान मुलांच्या कपड्यांची जाहिरात पाहिली. त्यावरून १६०० रुपयांचे कपडे ऑर्डर केले. पैसे भरल्याबाबत त्यांना कुठलाही संदेश मिळाला नाही. त्यांनी संबंधित संकेतस्थळाचा गुगलवरून ग्राहक सेवा क्रमांक मिळवला. त्यांना याबाबत विचारणा केली.
संबंधित कॉलधारकाने ७ एप्रिल रोजी कॉल करून पैसे रिफंड करण्यासाठी ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी संबंधित ॲप डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून तब्बल १९ हजार ९९८ रुपये वजा झाले. याबाबत मुलाला समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ डी.बी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.