Join us  

सेवानिवृत्तांना म्हाडाची घरे सोडावी लागणार; लवकरच बाहेर काढण्याची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 2:19 PM

मुंबई : म्हाडाची तब्बल ५६ घरे ही सेवानिवृत्तांनी बळकावल्याचे उघड झाले आहे. यात मोठ्या संख्येने निवृत्त अभियंतेही असून, ही ...

मुंबई : म्हाडाची तब्बल ५६ घरे ही सेवानिवृत्तांनी बळकावल्याचे उघड झाले आहे. यात मोठ्या संख्येने निवृत्त अभियंतेही असून, ही घरे आता सेवानिवृत्तांना सोडावी लागणार आहेत. कारण त्यांच्यावर आता निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीनंतरही गेल्या १० ते १५ वर्षांपासून ही घरे संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहेत.संबंधित सेवानिवृत्तांविरुद्ध लवकरच निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी सर्वसामान्य दरवर्षी अक्षरश: चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. सर्वसामान्यांसाठी असलेली घरे म्हाडाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवानिवासस्थानासाठी उपलब्ध करून दिली, परंतु आता सेवानिवृत्तीनंतर हीच घरे मालकी हक्काची करून देण्याबाबत संबंधित सेवानिवृत्त आग्रही आहेत. दरम्यान, आता सेवानिवृत्तांनी ही घरे रिकामी करून द्यावी, याबाबत याबाबत म्हाडाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. बेकायदा वास्तव्यासाठी अक्षरश: दुप्पट दराने म्हाडाकडून दंड आकारला जातो, परंतु हा दंडही सेवानिवृत्तांनी भरलेला नाही, तसेच घरेही रिक्त केलेली नाहीत. मात्र, आता हीच घरे मालकी हक्काने मिळावीत, यासाठी संबंधितांनी आता आग्रह धरला आहे. म्हाडा प्रशासनाने मात्र त्यासाठी नकार दिला आहे. काही सेवानिवृत्तांना म्हाडाने २००४ मध्ये  मालकी हक्काने घरे दिली होती. त्या ठरावाचा आधार आता सेवानिवृत्त घेत आहेत.

दोन घरे केली एकत्र-  म्हाडाच्या एका निवृत्त उपमुख्य अभियंत्याने शेजारचे घर विकत घेऊन दोन घरे एकत्र केली, तसेच आतून दरवाजाही काढल्याचे उघडकीस आले आहे. -  सेवानिवासस्थान आपल्याच मालकीचे आहे, असे गृहीत धरून त्याने असा प्रताप केला होता. -  हे पाहून पाहणी करण्यासाठी गेलेले म्हाडाचे अधिकारीही अक्षरश: चक्रावून गेले. -  ही घरे सध्या सील करण्यात आली आहेत. 

टॅग्स :मुंबईम्हाडा