मुंबई : पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे सध्याचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. परंतु गेले वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांची कमतरता भासली. कोरोनाविरुध्द सुरू असलेल्या लढ्यात वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले. मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळले नसल्याने पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय एक वर्षाने तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पालिका रुग्णालयात सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. २०१८ मध्ये राज्य सरकारने राज्य आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वय ५८ वरून ६० वर्षे केले आहे. पदोन्नतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध नसणे, नियत वयोमानानुसार, सेवानिवृत्तीने सतत रिक्त होत असलेली पदे, यामुळे सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांपैकी ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत.
रुग्णसेवेबरोबरच प्रशासकीय कामांमध्येही मनुष्यबळाची कमतरता आहे. पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळेही सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून एक वर्षाच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरूपात वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर शुक्रवारी मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.