Join us

एसटीविरोधी आंदोलनात सहभाग घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सवलती बंद !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 3:51 PM

गेल्या 25 जानेवारी रोजी एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतन विषयक अहवालाची एसटी महामंडळाच्या विभागीय व आगार कार्यालयाच्या समोर होळी करण्याचे आंदोलन केले. या आंदोलनात एसटीतून निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.

मुंबई : गेल्या 25 जानेवारी रोजी एसटी महामंडळातील काही कामगार संघटनांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीच्या वेतन विषयक अहवालाची एसटी महामंडळाच्या विभागीय व आगार कार्यालयाच्या समोर होळी करण्याचे आंदोलन केले. या आंदोलनात एसटीतून निवृत्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. अशा कर्मचाऱ्यांना त्यात निवृत्तीनंतर देण्यात येणारी मोफत प्रवास सवलत तातडीने बंद करण्याचे आदेश एसटी प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांचे मोफत प्रवास सवलत पासेस स्थानिक एसटी प्रशासनाने रद्द केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने न्यायालयात सादर केलेला वेतनवाढीचा अहवाल अमान्य झाल्याने, त्याची होळी करून निषेध करण्याचा प्रयत्न काही कामगार संघटनांनी केला होता. अशा आंदोलनात एसटीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला असल्याचे एसटी प्रशासनाच्या लक्षात आले. वस्तुतः निवृत्त कर्मचाऱ्यांचा व वेतनवाढीचा कोणताही संबंध नसताना त्यांनी एसटी विरुद्धच्या आंदोलनात सहभागी होऊन एसटीची प्रतिमा मालिन करणे अयोग्य आहे. त्यामुळे त्यांना एसटी कडून मिळणारी मोफत सवलत बंद करण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. याची नोंद एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांनी घ्यावी , असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :उच्च न्यायालयराज्य परीवहन महामंडळमहाराष्ट्र