मुंबई : मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे ३ महिन्यांपासून बंद असलेले वेतन पुन्हा सुरू होणार असून, तीन महिन्यांचे थकीत वेतनही मिळणार आहे. तसे लेखी पत्र शिक्षण निरीक्षकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांना सोमवारी दिले.बोरनारे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे रखडलेले वेतन सुरू करण्याच्या मागणीसाठी, २२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. शिक्षण निरीक्षकांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तूर्तास स्थगित करीत असल्याचे बोरनारे यांनी जाहीर केले. बोरनारे यांनी सांगितले की, अतिरिक्त शिक्षकांना समावेशन झालेल्या शाळांनी सामावून न घेतल्याने त्यांचे वेतन कुणी काढावे, अशी तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. परिणामी, डिसेंबर २०१६ पासून शिक्षकांचे वेतन बंद होते. वेतन बंद झाल्याने शिक्षकांची उपासमार सुरू होती. याबाबत शिक्षण निरीक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व शालेय शिक्षणमंत्र्यांकडे पाठपुरावा केला, तरीही मार्ग निघाला नाही. अखेर २२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात उपोषण करीत असल्याचे जाहीर केले. उपोषण जाहीर केल्याने, आता वेतन काढण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शिक्षण निरीक्षक कार्यालयाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षकांची देयके मागत, वेतन काढण्याचा मार्ग मोकळा केला आहे.शिक्षकांचे वेतन सुरू होण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याचे शिक्षण निरीक्षकांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. वेतन काढण्याचे आदेश शाळांना दिल्याने, बोरनारे यांनी २२ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात करीत असलेले उपोषण मागे घ्यावे, अशी लेखी विनंती निरीक्षकांनी केली आहे. शिक्षकांचे वेतन प्रत्यक्ष खात्यात जमा होण्यासाठी १ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. तेव्हा तूर्तास आंदोलन मागे घेत नाही, केवळ स्थगित करत आहे, असे बोरनारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांवर कारवाई करा!माध्यमिक शाळा संहितेमध्ये अतिरिक्त शिक्षकांना वेतन संरक्षण देण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तांनी तसे आदेश दिलेले आहेत. तरीही शिक्षकांचे वेतन थांबवले गेले. वेतन थांबवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिक्षक परिषदेने स्पष्ट केले आहे.
मुंबईतील शिक्षकांचे रखडलेले वेतन सुरू होणार
By admin | Published: February 21, 2017 6:48 AM