Join us

‘इंग्रजी नको’ म्हणणारे प्रतिगामी!

By admin | Published: February 26, 2015 11:03 PM

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची चिन्हे आहेत. यामुळे मराठीचे संवर्धन व वापर यात खरोखर काही गुणात्मक फरक पडणार आहे का?

>  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची चिन्हे आहेत. यामुळे मराठीचे संवर्धन व वापर यात खरोखर काही गुणात्मक फरक पडणार आहे का? की हा विषय फक्त काही लोकांच्या अभिमानापुरताच मर्यादित राहणार आहे?- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार ही खरोखर चांगली गोष्ट आहे; मात्र हा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून मराठीसाठी मिळणा-या निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. तरच अभिजात दर्जा मिळाल्याचा भाषेला फायदा होऊ शकेल, तिचे संवर्धन होऊ शकेल; अन्यथा हा फक्त मराठी माणसाच्या अभिमानाचा विषयच बनून राहील. मराठी भाषेचे हवे तसे संवर्धन होऊ शकले नाही, याला मराठी माणसे, शासन, शासकीय संस्था, विद्यापीठे, साहित्यिक संस्था, महामंडळे असे सर्वच घटक कारणीभूत आहेत. मराठी भाषेचा फक्त खोटा अभिमान बाळगायचा आणि तिच्या प्रत्यक्ष प्रचार-प्रसारासाठी काहीच ठोस उपाय योजायचे नाहीत, अशीच सर्वांची वागण्याची पद्धत राहिली आहे. मराठीसाठी ठोस पावले उचलण्याचा कोणाचा इरादा नाही, असाच अनुभव आजवर आला आहे. ४> मराठीच्या संवर्धन व प्रसारासाठी कोणते ठोस उपाय योजले पाहिजेत, असे तुम्हाला वाटते? - अशा बऱ्याच गोष्टी आहेत; पण सर्वांत आधी मराठी भाषेचा प्रमाण शब्दकोश निर्माण करण्याची आत्यंतिक निकड आहे. हिंदी भाषेत असा शब्दकोश आहे. इंग्रजीत आॅक्सफोर्ड विद्यापीठाने असा शब्दकोश कधीच तयार केला आहे. आपली तेवढी उंची नाही; मात्र मराठीतील परिपूर्ण असा शब्दकोशसुद्धा आपल्याकडून निर्माण होऊ शकला नाही. लोकमान्य टिळक यांच्या काळात (साधारणत: १९१८ -१९२०) असा शब्दकोश दोन खंडांत तयार करण्यात आला होता; मात्र त्यानंतर असा प्रयत्न झालेला नाही. पुढे भाषेत अनेक बदल झाले आहेत. मराठी विश्वकोशाचा उपक्रम चांगला आहे; मात्र तो एकदा तयार करून झाला की काम संपले, असे होऊ नये. ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असायला हवी. मराठीत दिवसेंदिवस भर पडणाऱ्या शब्दांचा समावेश त्यात व्हायला हवा. अनेकदा मराठी वृत्तपत्रे इंग्रजीतील शब्दांना चांगले पर्यायी मराठी शब्द शोधून काढतात. ते त्या वृत्तपत्रात वापरलेही जातात. मात्र ते नोंदवून ठेवण्याची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही. राज्यातील विद्यापीठेही याबाबत काही काम करीत नाहीत. एखाद्या वृत्तपत्रात काही दिवस असा पर्यायी शब्द वापरला जातो; मात्र त्याच वृत्तपत्रात रात्रपाळीचा उपसंपादक बदलला की, तो दुसरा शब्द वापरतो किंवा इंग्रजी शब्द वापरून मोकळा होतो. त्यामुळे तो चांगला शब्द विस्मरणात जातो. अशा शब्दांच्या संचयासाठी चांगली यंत्रणा निर्माण व्हायला हवी. ४साहित्याकडे वळूया... लेखनासाठी तुम्ही कादंबरीचा ‘फॉर्म’ वापरला आहे. काहींना कथा हा प्रकार महत्त्वाचा वाटतो, तर काव्यात अधिक ताकद असल्याचे काहींचे मत असते. साहित्यप्रकाराची तुम्ही अशी श्रेष्ठ-कनिष्ठ वर्गवारी कराल का?- मला कादंबरी हा साहित्यप्रकार महत्त्वाचा वाटतो. अर्थात, कथा, काव्यही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक साहित्यप्रकार हा महत्त्वाचाच असतो. मला मात्र कादंबरीत अधिक रस आहे. कादंबरीत या जगाचा, त्यातल्या माणसांच्या जगण्याचा सर्वांगीण वेध विस्तृतरीत्या घेता येतो. कथा, काव्यात त्याचे केवळ कवडसे दाखविता येतात. म्हणून मला कादंबरी महत्त्वाची वाटते. काव्य हे माणसाला वेड लावू शकते; पण ते परिपूर्ण होऊ शकत नाही. तथापि, साहित्यातील अमूक एकच प्रकार श्रेष्ठ, असे म्हणता येत नाही. कोणाला काव्य, तर कोणाला कथा महत्त्वाच्या वाटू शकतात. हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असते. ४आपण मराठी माध्यमातून शिकलात आणि इंग्रजीत पत्रकारिता केली. ‘इंग्रजी शाळा बंद कराव्यात’, असे विधान ‘ज्ञानपीठ’विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच केले होते. याविषयी तुम्ही काय सांगाल? - मुलांना प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच देणे गरजेचे आहे; मात्र इंग्रजी भाषेचे शिक्षणच नको ही अत्यंत प्रतिगामी अशी भूमिका आहे. महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले यांनी कायम वैश्विक शिक्षणाचा आग्रह धरला होता. स्त्रिया, मुलांनी गणित, इंग्रजी आणि विज्ञानाचे शिक्षण घेतले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता; मात्र लोकमान्य टिळकांनी त्यांना विरोध केला. स्त्रियांनी घरकाम, कशिदाकाम शिकावे. शेतकऱ्यांनी शेतीविषयक ज्ञान मिळवावे. स्त्रिया, शेतकऱ्यांना इंग्रजी शिकण्याची काय गरज, असा सवाल ते विचारत. तेव्हा आगरकर, गोखले ही माणसे टिळकांना ‘प्रतिगामी’ म्हणत. टिळक हे देशाचे राष्ट्रीय नेते होते; मात्र त्यांच्या या भूमिकेला पुरोगाम्यांनी विरोध केला होता. नेमाडे यांनीही आता तीच भूमिका मांडली असल्याने तेही प्रतिगाम्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. राज्याचे माजी शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांनी मुलांना पहिलीपासून इंग्रजी शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला, तेव्हा लोकांनी त्यांची टिंगल केली होती; मात्र तो निर्णय योग्यच होता. इंग्रजीच्या शिक्षणामुळे समाजव्यवस्थेतही समानता येते. उच्च मध्यमवर्गातील लोक इंग्रजी शिकतात म्हणून त्यांना मोठे अधिकारी होण्याची संधी मिळते. मग गरिबांनी फक्त मजुरीच करायची का? रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्याकाळी शिक्षणात इंग्रजीला स्थान दिले; मात्र हे शहरी लोकांना नामंजूर होते. नेमाडे हे त्याच पंक्तीत जाऊन का बसू पाहत आहेत? इंग्रजीचे शिक्षण हे अत्यावश्यक आहे, कारण अनेक क्षेत्रांतील अंतिम ज्ञान याच भाषेत उपलब्ध आहे. जगातील कोणत्याही भाषेतील उत्कृष्ट लेख वा साहित्य ताबडतोब इंग्रजीत भाषांतरित होऊन अभ्यासासाठी उपलब्ध होते. इंटरनेटवर याचा प्रत्यय येतो. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थकारण, व्यापार, वाणिज्य अशा सर्वच क्षेत्रांतील ज्ञान इंग्रजीत व्यापक प्रमाणात उपलब्ध आहे. बहुतेक क्षेत्रांतील शास्त्रीय ज्ञानही याच भाषेत आहे. आपल्या मराठी, हिंदी वा गुजराथीत नाही. देशाच्या बौद्धिक वर्तुळात अजूनही मराठी माणूस का मागे आहे? त्यात त्याला स्थान का नाही? कारण गेल्या ३०-४० वर्षांत मराठी माणसे इंग्रजीशी फटकून वागली. आजच अशी स्थिती असताना भविष्यात काय होईल, याची कल्पनाच न केलेली बरी! त्यामुळे इंग्रजीचे ज्ञान आत्मसात करायलाच हवे. ४साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी तुम्ही स्वत: प्रचार केला नाही वा राज्यात दौरे केले नाहीत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडप्रक्रिया नेमकी कशी असावी, असे वाटते? - साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी मी स्वत: प्रचार केला नाही, हे खरे आहे; पण प्रचार न केल्यामुळे इंदिरा संत यांच्यासारख्या व्यक्तीला पराभवाला सामोरे जावे लागल्याचाही इतिहास आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. साहित्य संमेलन अध्यक्ष निवडीची ही एक व्यवस्था रूढ झाली आहे. तिच्यात बदल करता येऊ शकतो. यापेक्षा चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी विद्वान, ज्ञानी लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी. साहित्य महामंडळानेही याबाबत पुनर्विचार करायला हवा. अर्थात, असा विचार करूनच ही लोकशाहीवर आधारलेली व्यवस्था स्वीकारलेली असावी; मात्र ती खऱ्या अर्थाने लोकशाहीवर आधारित आहे की नाही, हे तपासण्याची गरज आहे. वाचनप्रेमींनीही यासाठी पुढे यायला हवे. ४तुम्ही दोन राजकीय कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मोदींची लाट आठ महिन्यांत ओसरणे आणि ‘आप’ने मुसंडी मारणे याकडे तुम्ही कसे पाहता? जनमानस दिवसेंदिवस अल्पजीवी होत आहे का? - नाही. जनमानस असे अल्पजीवी होत नसते. खरे म्हणजे, लोक आता स्वत:च्या लाभाविषयी अधिक जागरूक झाले आहेत. दीर्घकालीन मार्ग दाखवणारी माणसे आता उरली नाहीत आणि निर्माणही होत नाहीत. महात्मा गांधी, नेहरूंनी असा मार्ग दाखवला होता, त्यावरच इतके दिवस कॉँग्रेस टिकली. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मोदींवर भरवसा ठेवला; मात्र सात-आठ महिने उलटल्यावर त्यांच्याकडून अपेक्षांची पूर्तता होत नसल्याचे पाहून त्यांनी ‘आप’कडे मोर्चा वळवला असावा, असे वाटते. ४डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर गोविंद पानसरे यांची हत्त्या झाली. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक म्हणून तुम्ही या घटनांकडे कसे पाहता?- महाराष्ट्रात अतिरेकी प्रवृत्ती वाढते आहे आणि हे चिंताजनक आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालायला हवा. अफगाणिस्तान, पाकिस्तानमधील तालिबान, पश्चिम आशियातील ‘इसीस’ यांसारख्या संघटनांशी मिळतीजुळती कार्यपद्धती या प्रवृत्तीची आहे. ‘आम्ही म्हणू तीच खरी संस्कृती, तोच खरा देव. तुम्हाला तो मानावाच लागेल, अन्यथा तुमचा खून पाडू, तुम्हाला तुच्छ लेखू’ असा या प्रवृत्तीमागचा विचार आहे. या देशात, राज्यात तर्कनिष्ठ, बुद्धिनिष्ठ आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मी या दोन्ही प्रकरणांचा जवळून अभ्यास केलेला नाही; मात्र जे घडले ते दुर्दैवी आहे, महाराष्ट्रासाठी लांच्छनास्पद आहे. या प्रवृत्तीला तातडीने आळा घालावा लागेल आणि याबाबत मोदींनीच पुढाकार घेणे अधिक चांगले होईल. ४सोशल मीडियामुळे प्रत्येकाकडे मत व्यक्त करण्याची ताकद आली खरी; पण यातून प्रत्येक गोष्टीबाबत झटपट मत, प्रतिक्रिया व्यक्त करणारी निष्क्रीय मानवी यंत्रे निर्माण होण्याचा धोका आहे का? - आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा सर्वांनाच लाभ होतो आहे; मात्र माहितीच्या या क्रांतीमुळे विकृतीही वाढत चालली आहे. सध्या सोशल मीडियावर पाच टक्के लोक राजकारणावर, अन्य घटनांवर बोलतात आणि इतर लोक स्वत:बद्दलच बोलत असतात. समाजातील बदलांशी याचा काही संबंध नाही; मात्र ही माध्यमे माणसांना विकृतीकडे नेत आहेत. बाजारातील वस्तू ग्राहकांच्या माथी मारण्यासाठीही या माध्यमांचा वापर करून घेतला जातो. त्याच्या किती आहारी जायचे, त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा, हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे.४मुलाखत : सुदीप गुजराथी