निसर्गाचा रेट्रोस्पेक्टिव्ह नजराणा! ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांचे कलाप्रदर्शन
By स्नेहा मोरे | Published: January 9, 2024 06:04 PM2024-01-09T18:04:31+5:302024-01-09T18:04:44+5:30
तैलरंग आणि जलरंगांचा अनोखा मिलाफ अत्यंत सृजनशीलपणे ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांच्या कलाकृतींतून दिसून येतो.
मुंबई- तैलरंग आणि जलरंगांचा अनोखा मिलाफ अत्यंत सृजनशीलपणे ज्येष्ठ चित्रकार यशवंत शिरवडकर यांच्या कलाकृतींतून दिसून येतो. शिरवडकर कायमच आपल्या कलाकृतींच्या निमिर्तीप्रक्रियेत पॅलेट आणि नाईफ यांचा वापर करतात. आपल्या निसर्गचित्रांमध्ये त्यांनी नेहमीच निसर्गाची बदलती रूपे आणि छायानाट्य यांचे प्रभावी चित्रण केले आहे. कुलाबा येथील जहांगीर कला दालनात या कलाकृतींचे प्रदर्शन १५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कला रसिकांना पाहण्याची संधी मिळणार आहे.
यशवंत शिरवडकर हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत, शिरवडकर यांचा दृश्य कलाक्षेत्रात मक्तेदारी आहे. हे त्यांचे १०१ वे एकल प्रदर्शन आहे. सुमारे ४५ वर्ष त्यांनी आपली चित्र साधना सुरू ठेवली, चित्रकला क्षेत्रात ते आपल्या अनोख्या चित्रशैलीसाठी ओळखले जातात. चित्रकलेच्या दीर्घ साधनेमुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली होती. देश परदेशातील अनेक मान्यवर चित्रसंग्राहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत.
रंग आणि प्रकाश हे शिरवडकर यांच्या कलाकृतींचे महत्वाचे घटक आहेत. गडद रंगांचा कौशल्याने वापर करून त्यांनी आपल्या चित्रांना जिवंत केले. चित्र माध्यम आणि चित्र तंत्रावरील त्यांची हुकूमत बघून कला रसिक कायमच त्यांची चित्रे बघून मंत्रमुग्ध होत आले आहेत. शिरवडकर यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भोवतीच्या निसर्गाला चित्र विषय म्हणून कायम प्राधान्य दिले. वाराणसीने त्यांना निसर्गचित्रणासाठी नेहमीच आकर्षित केले आहे. शिरवडकरांनी वाराणसीला तब्बल २८ वेळ भेट देऊन तिथला निसर्ग कुंचल्यात यशस्वीपणे पकडला. त्याचबरोबर शिरवडकरांनी केरळ, राजस्थान, गोवा येथील निसर्गरुपांचे, विविध ऋतूमध्ये त्यात होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बदलांचे व प्रकृतीच्या अदभुत रूपाचे दर्शन खास शैलीत सर्वांना घडविले.