मुंबईचा पारा १८ अंशांवर : तर सर्वात कमी गोंदियात ११ अंश तापमान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १८ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबईच्या किमान तापमानात तुलनेने घट कायम असल्याने येथील वातावरणात परत गारवा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
शनिवारच्या तुलनेत रविवारी मुंबईच्या किमान तापमानात २ अंशाची वाढ नोंद झाली असली तरी येथील हवामानात गारवा कायम असल्याने मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येत आहे. तर राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी हे किमान तापमान १८ अंशाखाली नोंद झाले आहे. परिणामी राज्यातही गारवा कायम असून, उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानाचा पारा आणखी खाली घसरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
-----------------
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
मुंबई १८.२, डहाणू १७.२, जळगाव १८.५, नाशिक १६.४, महाबळेश्वर १६.६, सातारा १८, पुणे १६.७, बारामती १७.९, परभणी १८.१, नांदेड १८.१, उस्मानाबाद १६, मालेगाव १८.४, औरंगाबाद १७.९, अकोला १७.९, अमरावती १७.१, गोंदिया ११.५, नागपूर १३.४, गडचिरोली १६.२, वर्धा १४.२.