Join us

मान्सूनचा परतीचा प्रवास पुढच्या आठवड्यात सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 4:20 PM

मुंबईत आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा कोसळणार

 

- मान्सून अंदमानात १७ मे रोजी दाखल- मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल- मान्सूनने १४ जुन रोजी मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्र व्यापला- मान्सूनने २६ जून रोजी संपूर्ण देश व्यापलामुंबई : जुन आणि जुलैमध्ये कमी बरसलेला मात्र ऑगस्टमध्ये आपली कसर भरून काढणारा मान्सून आता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुढच्या आठवड्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असून, या आठवड्याच्या शेवटी मुंबईत पुन्हा एकदा मान्सून जोर पकडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याच्या मध्यात मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणातही मान्सून सक्रीय राहील. मुंबईत काही ठिकाणी मोठा पाऊस पडेल. दरम्यान, सर्वसाधारणरित्या मान्सून १७ सप्टेंबरच्या आसपास आपला परतीचा प्रवास सुरु करतो.मान्सूनच्या परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून पुढील आठवड्यात सुरु होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत संपुर्ण उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशमधून मान्सून परतलेला असेल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरिस देशभरात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला. उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात मान्सून हलका ते मध्यम स्वरुपात बरसला. १० सप्टेंबर रोजी बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य भारतात पुन्हा एकदा मान्सूनचा जोर वाढेल, अशी माहिती स्कायमेटकडून देण्यात आली. दरम्यान, सध्या तरी मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे. सांताक्रूझ वेधशाळेत ०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहर, पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगरात सर्वाधिक म्हणजे २.०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पडझड सुरुच आहे. ७ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ३ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.  

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटमानसून स्पेशलहवामान