२८ सप्टेंबर रोजी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:57 PM2020-09-25T14:57:35+5:302020-09-25T14:57:58+5:30
राजस्थानाच्या पश्चिम भागातून आपल्या परतीचा प्रवास सुरु
मुंबई : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मान्सून २८ सप्टेंबर रोजी राजस्थानाच्या पश्चिम भागातून आपल्या परतीचा प्रवास सुरु करेल, अशी घोषणाच भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.
मागील वर्षी हवामान खात्याने मान्सूनचे आगमन आणि परतीच्या प्रवासावर संशोधन केले होते. मान्सूनच्या परतीचा प्रवास १ सप्टेंबर रोजी सुरु होत होता. मात्र संशोधनांती ही तारीख १७ सप्टेंबर करण्यात आली. कारण गेल्या काही वर्षांत असे निदर्शनास आले होते की मान्सून आपल्या परतीचा प्रवास सप्टेंबरच्या दुस-या किंवा शेवटच्या आठवड्यात सुरु करतो. त्यानुसार तारखांत बदल करण्यात आला.
हवामानात झालेल्या बदलामुळे मान्सून यावर्षी २८ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करत आहेत. नव्या तारखांनुसार मान्सून तब्बल दहाएक दिवसांनी आपला परतीचा प्रवास विलंबाने सुरु करत असून, येथील विलंबामुळे पुढील प्रवासदेखील विलंबाने होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. २८ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मान्सून राजस्थानानंतर जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशला निरोप देईल.
दरम्यान, हवामान खात्याच्या वेळापत्रकानुसार येत्या ८ ऑक्टोबर रोजी मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरु करणार आहे. तत्पूर्वी जुन्या वेळापत्रकानुसार, २९ सप्टेंबरच्या आसपास मान्सून मुंबईतून परतीचा प्रवास सुरु करत होता.
------------------------
मान्सूनच्या परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानातून सुरु होतो.
पंजाब, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधूनही याचवेळी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होतो.
पाच दिवसांपेक्षा अधिक काळ पाऊस झाला नाही तर मान्सून परतत आहे, असे गृहित धरले जाते.
हवेची दिशा पश्चिम, उत्तर पश्चिम झाली की मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होतो.
तापमानात वाढ होते.
------------------------
परतीच्या तारखा (ऑक्टोबर)
कोल्हापूर ११
सातारा ९
पुणे ११
मुंबई ८
अहमदनगर ८
जळगाव ६
नागपूर ६
------------------------
केव्हा कुठे दाखल झाला मान्सून
- अंदमानात १७ मे
- केरळमध्ये १ जून
- १४ जुन रोजी मुंबईसह महाराष्ट्र
- २६ जून रोजी संपूर्ण व्यापला
------------------------