परतीचा मान्सून ४८ तासांत महाराष्ट्रात दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 06:40 PM2020-10-20T18:40:06+5:302020-10-20T18:40:32+5:30
Monsoon News : हवामान बदलाचा फटका परतीच्या मान्सूनला बसला होता.
मुंबई : बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील हवामान बदलाचा फटका परतीच्या मान्सूनला बसला होता. परिणामी परतीचा मान्सून पुढे सरकला नव्हता. मात्र मंगळवारी हवामानात झालेल्या बदलानंतर आता येत्या ४८ तासांत परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. सद्यस्थितीमध्ये परतीचा मान्सून, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात असून, त्याचा प्रवास उत्तरोत्तर पुढे सरकणार आहे.
गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून, २१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईदेखील पावसाने ब-यापैकी विश्रांती घेतली असून, बुधवारी आणि गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामन्यत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.