Join us

परतीच्या पावसाचा विक्रम! गेल्या दहा वर्षांत प्रथमच शहरात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक वर्षावाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2022 7:09 AM

गेल्या २४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या सर्व परिसरात पावसाने तुफान फटकेबाजी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहर आणि उपनगराला शुक्रवारी पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून या काळात ११३.८ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस असून, रेकॉर्ड ब्रेक म्हणून हा पाऊस नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारीही शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली.

गेल्या २४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या सर्व परिसरात पावसाने तुफान फटकेबाजी केली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात सर्वाधिक पाऊस झाला असून, मुंबई महानगर प्रदेशात देखील पावसाने ऑक्टोबर महिन्यात आपला मारा कायम ठेवला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या हिटमुळे मुंबईकरांना घाम फुटला होता. सुरुवातीला उकाड्याने त्रस्त झालेला मुंबईकर गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आता सुखावला आहे.

सतत पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे मुंबईच्या हवेत गारवा आला आहे. शिवाय येथील उकाड्याचे प्रमाण कमी झाले आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पावसाची सातत्याने बॅटिंग सुरू असून पुढील तीन दिवस मुंबईसह राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कुठे झाला किती पाऊस/मिमी ग्रँट रोड २२६ दादर २०५ मस्जिद बंदर १८४ भायखळा १८१ महालक्ष्मी १७७ मरीन लाइन्स १७३ डोंबिवली १६९ कोपर खैरणे १४१ सायन १४० वर्सोवा आणि विक्रोळी १३४ चेंबूर १२८ घणसोली १२५ वांद्रे १२० बेलापूर ११९ ऐरोली ११५ सांताक्रूझ ११४ देवनार ११३ वाशी ११० अंधेरी १०९ पवई १०८ पनवेल १०६ ठाणे १०४ राम मंदिर ९४ मुंब्रा ९४ मुलुंड ८९ विरार ८७ पालघर ८७ दहिसर ८५ मानखुर्द ८२ मालवणी ७७ भाईंदर ६७ बोरिवली ६५ कांदिवली ६४ वसई ५७ डहाणू ५५ 

टॅग्स :मुंबईपाऊस