मुंबई : जून आणि जुलै महिन्यांत बऱ्यापैकी पडलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मुंबईसह महाराष्ट्राकडे पाठ फिरविली होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असतानाच हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, राजस्थानातून परतीच्या पावसाला विलंब होण्याची शक्यता आहे. शिवाय पुढच्या पाच दिवसांसाठी काही ठिकाणी जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारादेखील देण्यात आल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. तसेच १० आणि ११ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे, तर १२ सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, २० सप्टेंबरपर्यंत पाऊस राहील आणि मान्सून राजस्थानच्या वरच्या भागातून परतीचा पाऊस सुरू करेल, अशी शक्यता होती. मात्र, आता मान्सूनच्या राजस्थानमधून परतीच्या सुरुवातीला विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.