लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर भारतातून माघार घेतल्यानंतर आता शुक्रवारी परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आता परतीचा पाऊस छिंदवाडा, जळगाव, डहाणूमध्ये तळ ठोकून असून, येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
१५ ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. १६ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १७ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. १८ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
जालन्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
राणी उंचेगाव (जि. जालना) : घनसावंगी तालुक्यातील सरफगव्हाण येथे शुक्रवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तुकाराम काळे (४२) असे मयताचे नाव आहे. ते दुपारी शेतामध्ये काम करीत होते. अचानक पाऊस सुरू झाला व त्याचवेळी त्यांच्यावर अंगावर वीज कोसळली.
बार्शी, जेऊरमध्ये १००० मिमी पाऊस
- गेल्या साडेतीन महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व जेऊर मंडळांत एक हजार मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
- ९०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडलेली उपळे दुमाला, पानगाव, खांडवी, अर्जुननगर व उमरड ही मंडळे असून, जिल्ह्यात ७०० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडलेल्या मंडळांची संख्या ३२ इतकी झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"