मौल्यवान रत्नांचा लाभ न झाल्याने ग्राहकाला सव्वा लाख रुपये परत, ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:57 AM2018-12-24T06:57:09+5:302018-12-24T06:57:28+5:30

मौल्यवान रत्नांचा लाभ ३० दिवसांत मिळेल, अशी प्रसिद्धी करून ग्राहकाची फसवणूक झाली.

 Return of Rs.5 lakhs to the customer due to non-profit gems, order of customer grievance redressal forum | मौल्यवान रत्नांचा लाभ न झाल्याने ग्राहकाला सव्वा लाख रुपये परत, ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश

मौल्यवान रत्नांचा लाभ न झाल्याने ग्राहकाला सव्वा लाख रुपये परत, ग्राहक तक्रार निवारण मंचचा आदेश

Next

मुंबई : मौल्यवान रत्नांचा लाभ ३० दिवसांत मिळेल, अशी प्रसिद्धी करून ग्राहकाची फसवणूक झाली. याप्रकरणी दादरच्या सुवर्णस्पर्श जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी प्रा. लि. ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, मध्य मुंबईने १,३३,८७५ रुपये आणि नुकसानभरपाई, मानसिक त्रासापोटी २,००० रुपये देण्याचा आदेश नुकताच दिला.
माझगाव येथील उपवर मुलगा सुयोग्य वधू शोधण्यास अपयशी ठरला होता. पत्रिकेनुसार आवश्यक त्या विधी करूनही त्याला योग्य वधू मिळत नव्हती. एके दिवशी तो दादरला खरेदीसाठी गेला असता त्याच्या नजरेस सुवर्णस्पर्श जेम्स अँड ज्वेलरी प्रा. लि.ची जाहिरात पडली. मौल्यवान रत्ने धारण करून आयुष्यातील सर्व अडचणी १०० टक्के सुटतील, अशा ही जाहिरात होती. ती वाचून तो त्या दुकानात गेला.
दुकानातील ज्योतिषाला त्याने आयुष्यातील अडचणी सांगितल्या. त्या ऐकून ज्योतिषाने त्याला हिरा व पाचू धारण करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार काही दिवसांनी त्या तरुणाने २,६५,७५० रुपये खर्च करून त्याच ज्वेलर्सच्या दुकानातून हिरा व पाचू खरेदी केला. लाभ न झाल्यास रत्न परत घेऊन पैसे देऊ, अशी हमी ज्वेलर्सने संबंधित तरुणाला रत्न खरेदी करताना दिली होती.
तीस दिवस उलटूनही रत्नांचा काहीही प्रभाव जाणवला नाही. त्याने ही बाब संबंधित ज्वेलर्सवाल्याच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, त्यांनी आणखी एक महिना वाट पाहा, असा सल्ला त्या तरुणाला दिला. दोन महिने करता करता आठ महिने उलटूनही त्याला रत्नांचा काहीही प्रभाव जाणवला नाही. याबाबत त्याने दुकानदाराकडे वारंवार तक्रार केली. अखेर तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
पैसे परत मिळविण्यासाठी त्याने ज्वेलर्सकडे तगादा लावला. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने तरुणाने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
सुवर्णस्पर्श जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलर्स प्रा.लि.ने सेवेत कसूर केल्याचे म्हणत ग्राहक मंचाने त्यांना तरुणाला रत्नांचा लाभ न झाल्याबद्दल १,३३,८७५ रुपये परत करण्याचा आदेश दिला. तसेच मानसिक त्रासापोटी आणि तक्रारीचा खर्च म्हणून एकूण तीन हजार रुपये देण्याचे निर्देश दिले. तर तरुणाला रत्ने परत करण्यास सांगितले.


 

Web Title:  Return of Rs.5 lakhs to the customer due to non-profit gems, order of customer grievance redressal forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.