'कामावर परत या, अन्यथा पगार नाही'; गैरहजर कालावधीचे वेतन रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 12:09 IST2024-12-17T12:08:36+5:302024-12-17T12:09:40+5:30

पालिका सेवेत रुजू न होणाऱ्या पाच हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा इशारा दिल्यानंतर यापैकी ३,९०० कर्मचारी परतल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

return to work otherwise no salary bmc warns to employees | 'कामावर परत या, अन्यथा पगार नाही'; गैरहजर कालावधीचे वेतन रोखणार

'कामावर परत या, अन्यथा पगार नाही'; गैरहजर कालावधीचे वेतन रोखणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणुकीच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवरील १,१०० कर्मचारी अद्याप सेवेत रुजू झालेले नाहीत. हे कर्मचारी ताबडतोब रुजू न झाल्यास आता पुढील महिन्यातील त्यांचा पगार रोखण्यात येईल, असा अखेरचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे. यापूर्वी पालिका सेवेत रुजू न होणाऱ्या पाच हजार कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा इशारा दिल्यानंतर यापैकी ३,९०० कर्मचारी परतल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेचे ६० हजार कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते. पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेसुद्धा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, निवडणुका झाल्या आणि सरकार स्थापन झाल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून मुक्त करण्यात आलेले नाही. यात सर्वाधिक कर्मचारी हे लेखा विभाग, पेन्शन विभागासह अन्य विभागांतील असल्याने या विभागांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. पालिकेने वेतन कपातीचा इशारा दिल्यानंतर निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत.

गैरहजर कालावधीचे वेतन रोखणार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने, मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेकरिता ज्या आदेशांन्वये मनुष्यबळ अधिग्रहित केले होते, अशा सर्व आदेशांचा प्रभाव संपुष्टात आला. संबंधित मतदारसंघ कार्यालयातून आपल्या कार्यालयात रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त अहवालाशिवाय हजर करून घ्यावे, तसेच कार्यालयात रुजू न झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत यापूर्वी पाठविण्यात आलेल्या ई- मेलनुसार गैरहजेरी कालावधीकरिता वेतन रोखण्याची कार्यवाही करावी, असे आदेश पालिकेचे निवडणूक विशेष कार्य अधिकारी विजय बालमवार यांनी दिले.
 

Web Title: return to work otherwise no salary bmc warns to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.