नागरिक लसीकरणाविना माघारी तर कुठे लसींचा मर्यादित साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:07 AM2021-04-09T04:07:28+5:302021-04-09T04:07:28+5:30
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात मिळवण्यासाठी लसीकरण करणेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र गुरुवारी मुंबईत ...
मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर मात मिळवण्यासाठी लसीकरण करणेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र गुरुवारी मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा संपल्याने नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले. चेंबूर परिसरातील महानगरपालिकेच्या तसेच अनेक खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा गुरुवारी संपला होता. तर अनेक ठिकाणी मर्यादित साठा उपलब्ध होता. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. चेंबूरच्या महानगरपालिकेच्या ‘मा’ रुग्णालयात लसींचा मर्यादित साठा असल्याने केवळ आधी नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात येत होती. अनेक नागरिकांना पूर्वकल्पना नसल्याने रुग्णालयात येऊन घरी परतावे लागले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते. काही ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयाचे तीन मजले चढून घरी परतावे लागल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला. अशीच काहीशी स्थिती चेंबूर येथील खासगी रुग्णालयांमध्ये होती. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच उभे राहून नागरिकांना लसींचा साठा संपल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे अनेक रुग्णालयांच्या येथे वादाची परिस्थिती निर्माण झाली होती.