Join us  

विमानाने मायदेशात निघाल्या आणि सापडली हरवलेली पैशांची बॅग, टांझानियातून उपचारांसाठी आलेल्या माय-लेकींची अशीही कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 3:04 AM

ज्या रिक्षाचालकाला ही बॅग सापडली त्याला त्या नोटा नकली वाटल्याने त्याने तशाच ठेवल्या होत्या.

मीरा रोड : टांझानियावरून मीरा रोडमध्ये उपचारांसाठी आलेली आई आणि मुलगी या दोघी २ हजार ४०० डॉलर असलेली बॅग रिक्षातच विसरल्या होत्या. रिक्षाचालकाने स्वतःहून बॅग आणून दिली नाही, पण पोलिसांनी मात्र तत्काळ शोध घेऊन रिक्षाचालकाच्या घरातून डॉलर आणि मोबाइल असलेली बॅग जप्त करून माय-लेकीस परत केली. 

ज्या रिक्षाचालकाला ही बॅग सापडली त्याला त्या नोटा नकली वाटल्याने त्याने तशाच ठेवल्या होत्या. परंतु, पैसे हरवल्याने त्या माय-लेकींनी उपचार न करताच परत जाण्याचा निर्णय घेत शनिवारची विमानाची तिकिटे काढली होती. आता सहा महिन्यांनंतर त्या पुन्हा उपचारांसाठी येणार आहेत.

नसरा मोहम्मद फक्री  यांना मेंदूशी निगडित आजार असल्याने त्यांना घेऊन त्यांची मुलगी शादिया सालू  (२०) ही टांझानियावरून मीरा रोडमध्ये आली होती. गुरुवारी रात्री त्यांनी मीरा रोड रेल्वेस्थानक येथून रिक्षा पकडून हॉक्सटन हॉटेलमध्ये आल्या. रिक्षातून उतरताना उपचार आणि खर्चासाठी आणलेले २ हजार ४०० डॉलर, मोबाइल आणि सुमारे ५०० भारतीय रुपये असलेली बॅग त्या रिक्षातच विसरल्या. बॅग विसरल्याचे कळताच त्यांनी परिसरात रिक्षाचा शोध घेतला, मात्र काही सापडले नाही. 

शुक्रवारी त्यांनी मीरा रोड पोलिस ठाण्यात जाऊन बॅग हरवल्याची तक्रार दिल्यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी तत्काळ दखल घेत  हवालदार विलास गायकवाड व अन्य पोलिसांना त्या रिक्षाचा शोध घेण्यास सांगितले. गायकवाड यांनी सीसीटीव्हीवरून रिक्षाचा क्रमांक मिळवल्यावर त्या रिक्षाचा मालक हा विरारमध्ये राहणारा उमर फारूक इर्शाद खान असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला विरारमध्ये गाठले. त्यावेळी त्याने ती रिक्षा दुसऱ्याला चालवण्यास दिल्याचे सांगितले. 

पोलिसांनी दुसऱ्याकडे चौकशी केली असता त्याने रिक्षा तिसऱ्यालाच म्हणजे काशिमीराच्या मुन्शी कंपाउंडमध्ये राहणाऱ्या मोहम्मद खुददुस याला दिल्याचे सांगितले. गायकवाड व पथकाने मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या मोहम्मद याला मीरा रोडमध्ये रिक्षावर असतानाच पकडून घरी नेले. तो राहत असलेल्या घरात पोलिसांना बॅग मिळून आली. त्यात २४०० डॉलर व मोबाइल तसाच होता, मात्र भारतीय चलनातील ५०० ते ६०० रुपये मोहम्मद याने खर्च करून टाकले होते.

पोलिसांचे आभारबॅग मिळताच वरिष्ठ निरीक्षक सरोदे यांनी त्या महिलांना बोलावून त्यांची डॉलर व मोबाइल असलेली बॅग परत केली. महिलांनी पैसे परत मिळाल्याचे पाहून आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :मुंबई