लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जळगावमध्ये वापरलेल्या मास्कची गादी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेत असे प्रकार होणे अत्यंत जीवघेणे असल्याची माहिती राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी दिली. मास्कची योग्य प्रकारे विल्हेवाट कशी लावावी याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...
* वापरलेल्या मास्कचा गादीसाठी उपयोग करणे योग्य आहे का?
वापरलेल्या मास्कचा कोणत्याही स्वरूपाचा वापर हा संसर्गाची साखळी पसरविण्याचा मार्ग आहे. सध्या राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग तीव्र होतो आहे, अशा स्थितीत या प्रकारांमुळे संसर्गाची साखळी तोडण्याऐवजी याद्वारे गादी तयार करणाऱ्या व्यक्तीपासून ते वापर करणारे सर्व जण बाधित होण्याची ९९.९९ टक्के शक्यता आहे. त्यामुळे असे प्रकार यंत्रणांनी वेळीच रोखणे गरजेचे आहे.
* घरात वापरलेल्या मास्कची विल्हेवाट कशी लावावी?
मास्कची विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रुग्णालयाच्या आवारात वापरलेले मास्क असतील तर पिवळ्या रंगाच्या बायोमेडिकल कचरा टाकत असलेल्या कुंडीत टाकावे. त्यानंतर हे मास्क ठराविक प्लांटवर नेऊन जाळून टाकण्यात येतात. मात्र या मास्कचा पुनर्वापर हा अत्यंत धोकादायक असून रुग्णालय, नर्सिंग होम्स, कोविड केंद्राच्या परिसरातील मास्कची योग्य विल्हेवाट लावावी.
* घरात वापरलेल्या मास्कची विल्हेवाट कशी लावावी?
घरात असताना वापरलेला मास्क सोडियम हायड्रोक्लोराईड किंवा ब्लिचमध्ये बुडवून काढावा, त्यानंतर कागदी पिशवीत ४८ ते ७२ तास राहू द्यावा. या मास्कचे कात्रीने तुकडे करून टाकून देण्यात यावे, ही कात्री अन्य कोणत्याही कामासाठी वापरू नये. शिवाय, संसर्ग होण्यात जोखमीचे गट असणाऱ्या सहव्याधी, गर्भवती आणि लहान मुलांपासून वापरलेले मास्क दूर ठेवावेत. रस्त्यात टाकले किंवा कचऱ्याच्या ढिगात फेकून दिले तर यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकेल. धोकादायक कचरा या श्रेणीनुसार कचरावेचकांकडे वापरलेले मास्क वेगळे द्यावेत. हा कचरा इन्सिनरेटरमध्ये जाळण्यात येतो.
(मुलाखत - स्नेहा मोरे)
.......................