मुंबई - कुर्ला स्थानकावर छप्पर बसविण्याचे काम सुरू असल्याने पादचारी पुलावरून स्थानकावरील सर्व हालचाली दिसून येतात. त्यामुळे लिंबूवाला कशाप्रकारे लिंबू सरबत बनवित आहे, हे दिसून आले. यासंदर्भात एका प्रवाशाने लिंबू सरबत वाल्यांचा व्हिडीओ काढून रेल्वे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
लिंबू पाणी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच लिंबू सरबत बनविणारा हात धुवत आहे. एका अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन लिंबू सरबत बनविण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. सोशल मीडियावरून लिंबू सरबतवाल्यांचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून या विरोधात युजर्संकडून राग व्यक्त केला आहे. लिंबू सरबत वाल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया युजर्संनी व्यक्त केली.
कुर्ला स्थानकावरील लिंबू सरबताच्या दुकानातील लिंबू पाण्याचे नमुना सखोल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. चौकशी होईपर्यंत दुकानाला स्टॉल टाळे ठोकण्यास आले आहे. मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्टॉलची पाहणी केली. सखोल तपासणीअंती पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये मोठा आर्थिक दंड किंवा परवाना रद्द करण्यात येण्याची शिक्षा देण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.