Join us

मद्य परवान्यातून ८० लाखांचा महसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 5:59 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणाऱ्या आॅनलाइन मद्य परवान्यांमध्ये सुमारे पावणेदोन वर्षांमध्ये सुमारे साडेसात हजार जणांची भर पडली आहे.

- खलील गिरकर मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणाऱ्या आॅनलाइन मद्य परवान्यांमध्ये सुमारे पावणेदोन वर्षांमध्ये सुमारे साडेसात हजार जणांची भर पडली आहे. या माध्यमातून विभागाला ८० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.२ आॅक्टोबर २०१६ ते ३० जून २०१८ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे राज्यभरात ८ हजार ३३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी १८ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले तर ४६१ जणांची प्रकरणे प्रलंबित आहेत. सध्या एकूण ७ हजार ५५४ जणांना आॅनलाइन मद्य पिण्याचे परवाने देण्यात आले. हे आजीवन परवाने आहेत. आजीवन मद्य पिण्याचा परवाना मिळवण्यासाठी सध्या १००५ रुपयांचे शुल्क आकारले जाते. या माध्यमातून विभागाला ८० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. क्लबसाठीच्या परवान्यासाठी या कालावधीत राज्यात १६ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक अर्ज तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याने फेटाळण्यात आला तर उर्वरित सर्वांना आॅनलाइन परवाने जारी करण्यात आले.परमिट रूम-बारसाठी या कालावधीत राज्यभरात ४११ अर्ज विभागाकडे दाखल झाले. त्यापैकी १३ अर्जदारांना परवाने देण्यात आले. ३९७ जणांचे अर्ज प्रलंबित आहेत. या परवान्यांसाठी अर्ज करण्याचे १००५ रुपये शुल्क आकारले जाते. त्या माध्यमातून विभागाला ४ लाख १३ हजार ५५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. याव्यतिरिक्त काही प्रसंगी आॅफलाइन पद्धतीनेदेखील परवाने देण्यात येतात. याशिवाय आतापर्यंत इतर परवाने तसेच अर्जांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुमारे पावणेदोन वर्षांत ८६ लाख ९२ हजार ७७६ रुपयांचा महसूल मिळाला आहे.>...अन्यथा कारवाईकायमस्वरूपी मद्य परवाना व एका वर्षासाठी देण्यात येणारा परवाना विभागातर्फे देण्यात येतो. एक दिवसाचा मद्य परवाना घेण्यासाठी त्याचे परवाना शुल्क घेऊन परवाना देण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आलेले आहेत. मद्य परवाना असल्याशिवाय मद्य प्राशन केल्यास कारवाई केली जाते. त्यामुळे मद्य प्राशन करण्यापूर्वी मद्य प्राशन करण्याचा परवाना घ्यावा, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :दारुबंदी कायदा