महसूल कर्मचारी संपावर
By admin | Published: August 2, 2014 12:52 AM2014-08-02T00:52:20+5:302014-08-02T00:52:20+5:30
राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
खालापूर : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. खालापूर तालुक्याच्या तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. आपल्या मागण्या शासन दरबारी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालये ओस पडली आहेत.
राज्यातील महसूल कर्मचारी यांच्या सेवेत काम करीत असताना अनेक मागण्या गेली अनेक वर्षे महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत. संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांच्या सह संघटनेचे सर्व पदाधिकारी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करीत असतानाही शासन पातळीवर याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. कर्मचाऱ्यांनी सेवेमध्ये प्रामाणिक राहूनही कर्मचाऱ्यांच्या पदरात अपेक्षेपेक्षा कमी दाम मिळत असल्यासारखी अवस्था कर्मचाऱ्यांची असल्याने संघटनेच्या आदेशाने राज्यभरातील सर्व महसूल कर्मचारी शुक्रवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनात सामील झाले असून शासनाने मागण्यांचा प्राधान्याने तत्काळ विचार करून त्यावर उचित कार्यवाही करण्याची गरज असल्याची अपेक्षा खालापूर येथील संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कामबंद आंदोलन सुरु झाल्याने कामासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले. याचा फटका जनतेला बसत आहे. (वार्ताहर)