Join us

चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मागे घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

अन्यथा आंदोलन करू; व्यसनमुक्ती चळवळीचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय अत्यंत निषेधार्ह असून, तो ...

अन्यथा आंदोलन करू; व्यसनमुक्ती चळवळीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चंद्रपुरातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय अत्यंत निषेधार्ह असून, तो तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नशाबंदी मंडळाने या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तत्कालीन आघाडी सरकारने नेमलेल्या देवताळे समितीच्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली. हजारो महिलांनी ५ वर्षे केलेल्या आंदोलनाचा हा विजय होता. परंतु, दारूबंदीचा निर्णय रद्द करून राज्य सरकारने या महिलांचा अपमान केला आहे, अशा भावना पत्रातून व्यक्त करण्यात आल्या.

अवैध दारू विक्री वाढल्याने चंद्रपूरची दारूबंदी उठवली, हे कारण म्हणजे सरकारने स्वतःच्याच अपयशाची कबुली देण्यासारखे आहे. वास्तविक तेथे पकडली जात असलेली अवैध दारू हे बंदीचा निर्णय यशस्वी होत असल्याचे उत्तम उदाहरण होते. पण अवैध प्रकार रोखण्याऐवजी सरसकट बंदी उठवून सरकारने व्यसनमुक्ती चळवळीला बदनाम केले. तत्कालीन सरकारने दारूबंदीनंतर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा असा ड्राय झोन जाहीर करून ४५ अधिकाऱ्यांचे विशेष पथक कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तसे काही झाले नाही. या निर्णयाच्या कठोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ दिले असते तर अवैध विक्रीला आळा बसला असता, असे पत्रात म्हटले आहे.

दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातही गुन्ह्यांची संख्या कमी झाली. महिलांवरील अत्याचार थांबून त्या सुखी आयुष्य जगू लागल्या. दारूतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी सरकारला जास्त खर्च करावा लागतो हे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. अशा स्थितीत पालकमंत्र्यांनी सरकारवर दडपण आणून हा निर्णय घ्यायला भाग पाडले, असा आरोप पत्रात करण्यात आला.

* म्हणणे काय?

व्यसनांध व्यक्तींचे आयुर्मान दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक व्याधींनी ते ग्रस्त आहेत. राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आपण या विषयाकडे राजकारण आणि अर्थकारण याच्या पलीकडे बघून कठोर भूमिका घ्यावी व चंद्रपूरची दारूबंदी पुन्हा अमलात आणावी. अन्यथा महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील कार्यकर्ते आंदोलनाची हाक देतील, असा इशारा देण्यात आला आहे.

------------------------------------