सीसीटीव्ही फुटेजची ‘रिव्हर्स पडताळणी’

By गौरी टेंबकर | Updated: January 29, 2025 14:13 IST2025-01-29T14:13:29+5:302025-01-29T14:13:51+5:30

वडिलांनीही बांगलादेशमधून माझ्या मुलाचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून, पोलिसांनी त्याला विनाकारण गोवल्याचा आरोप केला होता.

Reverse verification of CCTV footage in saif ali khan attack case | सीसीटीव्ही फुटेजची ‘रिव्हर्स पडताळणी’

सीसीटीव्ही फुटेजची ‘रिव्हर्स पडताळणी’

गौरी टेंबकर - कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास (३०) याच्या सीसीटीव्ही फुटेजमधील इमेजची रिव्हर्स (उलट) पडताळणी वांद्रे पोलिस करणार आहेत. यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.

शरीफुल याला जवळपास ४६० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून ठाण्यातून अटक करण्यात आली होती. हेच सीसीटीव्ही फुटेज आता पडताळण्यात येणार आहेत. तसेच तो जिथे दिसला, त्याठिकाणी त्याची इमेज वेगवेगळी का दिसत आहे, याबाबत खुलासा करण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही तज्ज्ञांची मदत घेणार आहेत. सीसीटीव्हीच्या गुणवत्तेनुसार नाइट व्हिजनमध्ये कैद झालेली व्यक्ती ही बऱ्याचदा लहान - मोठी दिसते. तसेच त्यांचे वयही कमी - जास्त दिसू शकते, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार या पडताळणीमुळे अटक आरोपी शरीफुल हाच सैफवरील हल्लेखोर असल्याचे सिद्ध करण्यास पोलिसांना मदत होईल. 
सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी आणि शरीफुल यांच्यात बराच फरक दिसत असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनीही बांगलादेशमधून माझ्या मुलाचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसून, पोलिसांनी त्याला विनाकारण गोवल्याचा आरोप केला होता.

तो सगळीकडे दिसतोय
शरीफुलला पळण्यासाठी लेबर कॉन्ट्रॅक्टर अमित पांडे याने हजार रुपये दिल्याची माहिती मिळत आहे. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर पांडेने तू सगळीकडे दिसतोयस तू इथून पळून जा, असे सांगितल्याचा दावा करण्यात येत आहे.

आम्ही आरोपी शरीफुलच्या घटनास्थळाहून ताब्यात घेतलेल्या फिंगरप्रिंट अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. तोच खरा आरोपी असून, त्याच्या विरोधात आमच्याकडे कागदोपत्री तसेच तांत्रिक असे भक्कम पुरावे आहेत. तो बांगलादेशमधून आल्यानंतर कोलकतामध्ये राहिल्याने तिथल्या तसेच अन्य कनेक्शनचीही चौकशी सुरू असून, लवकरच ओळख परेडही करण्यात येईल.
परमजीतसिंग दहिया, 
अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग)

यादीत अमिताभ, सलमान, रेखा !
सीसीटीव्हीमध्ये शरीफुल हा १, ९, १० आणि १३ तारखेला मुंबईमध्ये रेकी करताना दिसला. त्याने १४ तारखेला अंधेरीमधून सकाळी रिक्षा पकडून वांद्रेपर्यंत फिरत अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रेखा यांसारख्या सेलिब्रिटींच्या घराची रेकी केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. अखेर १६ जानेवारीला त्याला सैफच्या घरात शिरण्यात यश मिळाले.

म्हणून बदलला अधिकारी !
अभिनेता सैफ अली खानवरील हल्लाप्रकरणात तपास अधिकाऱ्याला बदलण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रशासकीय कारणामुळे तपास अधिकारी बदलल्याची माहिती परमजीतसिंग दहिया यांनी पत्रकारांना दिली. मंगळवारी वांद्रे येथील परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या कार्यालयामध्ये दहिया यांनी वांद्रे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मराठे आणि अन्य अधिकाऱ्यांसह एक पत्रकार परिषद घेतली. 

यात त्यांनी सैफ हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला बदलण्यामागचे कारण हे प्रशासकीय आहे. हल्ला झाला त्या दिवशी आधीचे तपास अधिकारी हे नाईट पीआय म्हणून कर्तव्यावर होते. ते फर्स्ट रिस्पाँडर असून, नियमानुसार ते प्रकरण दुसऱ्या अधिकाऱ्याला वर्ग होईपर्यंत त्याची जबाबदारी आधीच्या अधिकाऱ्यावरच असते. त्यानुसार हा बदल केल्याचे दहिया म्हणाले. 
लीलावती रुग्णालयाच्या सीसीटीव्हीनुसार सैफ पहाटे २:४७  वाजता तिथे पोहोचला. त्याचे फूटेज पोलिसांकडे आहे. आमच्याकडे तो बांगलादेशी नागरिक असल्याबाबत ठोस पुरावे असून, आरोपीला सिम कार्ड पुरवणाऱ्या महिलेसह या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदविले आहेत. या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे समोर आले आहे. तसेच २९ जानेवारी रोजी आरोपीला कोर्टामध्ये हजर करत वाढीव रिमांडसाठी विनंती कर आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Reverse verification of CCTV footage in saif ali khan attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.