Join us

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:07 AM

मुंबई : कोविडच्या आपत्तीवर मात करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आढावा घेतला. ...

मुंबई : कोविडच्या आपत्तीवर मात करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी आढावा घेतला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांची त्यांनी माहिती घेतली.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी निधी चौधरी, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित विभागाचे उपायुक्त उपस्थित होते. ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास त्याविरुद्ध लढण्यासाठी उपलब्ध खाटा, ऑक्सिजन व इतर सुविधांंसंबंधी मुंबई पालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोना संकटामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. यात महिलांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. याबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी चर्चा केली. गेल्या आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले.

याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून ठाकरे म्हणाले, यापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावे. यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, नोकरदारांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मुंबई पालिकेला केली.