आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांची आढावा बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश

By जयंत होवाळ | Published: September 13, 2024 05:55 PM2024-09-13T17:55:42+5:302024-09-13T17:56:09+5:30

विधानसभा निवडणुकीशी संबंधीत मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे.

review meeting was held by bhushan gagrani for the upcoming maharashtra assembly election 2024 | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांची आढावा बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भूषण गगराणी यांची आढावा बैठक; दिले महत्त्वाचे निर्देश

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, यादृष्टीने सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत,असे निर्देश पालिका आयुक्त तसेच निवडणूक जिल्हाधिकारी भूषण गगराणी यांनी आज आयोजित केलेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले. निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली.

बैठकीस पालिकेचे तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदान संयंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी, पोलिस आणि निवडणूक यंत्रणा यांच्याकडून विविध मतदारसंघांमध्ये संयुक्त पाहणी आदींबाबत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी आढावा सादर केला. संपूर्ण स्थिती जाणून घेत प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर गगराणी यांनी काही सूचना केल्या.

विधानसभा निवडणुकीशी संबंधीत मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. मतदार यादीमध्ये मतदारांची नाव नोंदणी करणे इत्यादी प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी. नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून अगदी जवळ मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभ रचनेवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देखील गृहनिर्माण संस्थांशी पुन्हा एकदा भेटी देऊन समन्वय साधावा. संपूर्ण कामकाजादरम्यान कोणत्याही प्रकारची लहानात लहान अडचण असेल तरी ती आपल्याकडे न ठेवता त्यावर वेळीच आणि योग्य पद्धतीने तोडगा निघावा, यासाठी वरिष्ठांशी वेळोवेळी चर्चा करावी,असे त्यांनी सांगितले.

Web Title: review meeting was held by bhushan gagrani for the upcoming maharashtra assembly election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.