लॉकडाऊन काळातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, ३० सप्टेंबरपर्यंत 'हा' आदेश लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:40 PM2020-05-15T17:40:59+5:302020-05-15T17:45:29+5:30

पावसाळ्याच्या धर्तीवर राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

Revised Guidelines for Lockdown Issued by government, Order Applied by September 30 MMG | लॉकडाऊन काळातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, ३० सप्टेंबरपर्यंत 'हा' आदेश लागू

लॉकडाऊन काळातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, ३० सप्टेंबरपर्यंत 'हा' आदेश लागू

googlenewsNext

मुंबई - लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात लॉकडाऊनचा चौथा टप्पा ठरवते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, राज्याला ज्या महत्त्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. पावसाळ्याच्या धर्तीवर राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 2  मे 2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. सुमारे गेल्या ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात  ने आण करण्याची व्यवस्था, त्यात येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग-व्यवसायांना सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून वीजेचा वापर ५० टक्के पर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे अशी माहितीही देण्यात आली. आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली.

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पावले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. राज्यात लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांसंदर्भात शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट, प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा आदेश ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या पॅकेजची राज्यात अंमलबजावणी कशी करायची तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे व दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे यासाठी तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.
 

Web Title: Revised Guidelines for Lockdown Issued by government, Order Applied by September 30 MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.