मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना पूर्वतयारी करण्याचे निर्देश देण्याची सिनेट सदस्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, देशातील १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मेपासून लस दिली जाणार आहे. यात राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये लस दिली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या तब्बल ८ लाख ९५ हजार ४७२ विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, यासाठी मुंबई विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याविषयी जनजागृती आणि सहकार्य करावे, अशी मागणी युवा सेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यपालांची भेट घेतली असून, त्यांना या संदर्भात संकल्पना समजावून सांगितली आहे. आता लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्याने साहजिकच महाविद्यालयांच्या आवारात लसीकरण केंद्रांना परवानगी मिळणे कठीण आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयांऐवजी त्यांच्याच जवळच्या लसीकरण केंद्रात लस घेणे सुरक्षित व फायद्याचे ठरू शकते, असे असले तरी किमान महाविद्यालयांना याबाबतची कल्पना देऊन पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांमधील जनजागृतीची जबाबदारी स्वीकारण्यास सांगावी, त्यांना लसीकरणासाठी नोंदणीचे महत्त्व पटवून देणे यासारखी कामे महाविद्यालयांनी करण्याचे निर्देश महाविद्यालयांना द्यावेत, अशी मागणी केल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमात तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले असले, तरी याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना द्याव्यात, असा यामागचा उद्देश असल्याचे सावंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा विचार केला असता, १८ वर्षांवरील तब्बल ८ लाख ९५ हजार ४७२ विद्यार्थ्यांचा लसीकरणामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये आर्टस् , कॉमर्स, फाईन आर्टस्, ह्युमॅनिटीज, लॉ, इंटरडिसिप्लिनरी, टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विद्याशाखांच्या विदयार्थ्यांचा समावेश असणार आहे. यासाठी परवानगी मिळाल्यास विद्यापीठाच्या कालिना संकुलातही लसीकरण केंद्र सुरु करण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिनेट सदस्यांना दिली आहे. यामुळे या लसीकरण मोहिमेचा उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.
-------
चौकट
विद्याशाखा - एकूण विद्यार्थी संख्या
आर्टस् - १३३६७५
फाईन आर्टस् - ४३२
कॉमर्स - ५२६४५४
ह्युमॅनिटीज - २१७०
इंटरडिसिप्लिनरी - १०७४
लॉ - ९०४४
सायन्स - १६६००३
सायन्स अँड टेक्नॉलॉजी - ८७२
टेक्नॉलॉजी - ५५५४८
एकूण - ८९५४७२