लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: भाजपाने पहारेकऱ्यांची भूमिका स्वीकारल्यामुळे, महापालिकेत स्वबळावर आलेल्या शिवसेनेचे आपले महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याप्रमाणे, महालक्ष्मी रेसकोर्सवरील थीम पार्कच्या प्रस्तावानंतर, आता झुणका भाकर केंद्रांचेही पुनरुज्जीवन करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यास, मुंबईत बंद असलेली झुणका भाकर केंद्रे ‘अन्नदाता केंद्रां’च्या रूपाने सुरू होण्याची चिन्हे आहेत. राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना, ‘झुणका भाकर केंद्र’ ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या केंद्रांना टाळे मारण्यात आले. सन २००० मध्ये बंद करण्यात आलेल्या या योजनेला नवजीवन देण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालय ते थेट सर्वोच्च न्यायालयातही विनंती अर्ज करण्यात आले. मात्र, तिथेही विनंती अर्ज फेटाळून लावण्यात आले. ही केंद्रे दुसऱ्या नावाने सुरू करण्याचा निर्णय २००९ मध्ये घेण्यात आला. मात्र, ही योजना वादात अडकून रखडली. या योजनेच्या लाभार्थींवरून वाद निर्माण झाला. परिणामी, या योजनेचा हेतू सफल झाला नाही. मात्र, शिवसेनेची ही योजना पुनर्जीवित करण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यानुसार, बंद झालेली झुणका भाकर केंद्रे अन्नदाता आहार केंद्र नावाने सुरू करावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे.सन २००० मध्ये आघाडी सरकारच्या निर्णयामुळे मुंबईतील झुणका भाकर केंद्रे बंद करण्यात आली.या योजनेला पर्याय म्हणून, ‘अन्नदाता आहार केंद्र’ या नावाने २१५ अन्नदाता आहार केंद्रे व १२५ शिव वडापाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ‘एक अनार सौ बिमार’ अशी अवस्था या योजनेची झाली. रस्ते, पादचारी मार्ग आणि आरक्षित जागांवर अशा स्टॉल्सना परवानगी देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
‘अन्नदाता’ आहार केंद्राचे पुनरुज्जीवन
By admin | Published: July 05, 2017 6:50 AM