चिमुरड्याला नवसंजीवनी; अन्ननलिकेत अडकलेले नाणे काढले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:34 AM2020-06-02T06:34:51+5:302020-06-02T06:35:04+5:30
कोरोनाचा धोका पत्करून केली शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे शहापूरमधील चिमुरड्याला जीवदान मिळाले आहे. कान, नाक व घसातज्ज्ञ डॉ. नीलम साठे यांनी शस्त्रक्रिया करत या आठ वर्षांच्या मुलाने गिळलेले एक रुपयाचे नाणे अन्ननलिकेतून बाहेर काढले. कोरोना संसर्गाचा धोका पत्करून त्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली.
शहापुरात राहणाऱ्या आठ वर्षांच्या प्रेम वानखेडे या मुलाने खेळताना एक रुपयाचे नाणे
गिळले होते. आईवडिलांनी सुरुवातीला परिसरातील राजीव गांधी मेडिकल रुग्णालय, आरजीएमसी मेडिकल रुग्णालय, शिवाजी रुग्णालयाचे उंबरे झिजवले. मात्र एन्डोस्कोप नसल्याचे कारण देत या रुग्णालयांत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शविण्यात आली.
रविवारी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेने वानखेडे कुटुंब शहापूरहून परळमधील केईएम रुग्णालयात पोहोचले. नाणे अन्ननलिकेत अडकल्याने जवळपास १२ तासांपासून चिमुरडा अन्नपाण्याशिवाय होता. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. नीलम साठे यांनी मोठा धोका पत्करून प्रेमवर तातडीने शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करणे इतर वेळी तसे जिकिरीचे नसते; मात्र सध्याच्या काळात पीपीई किट घालून सर्जरी करणे काहीसे आव्हानात्मक होते, असे डॉ. साठे यांनी सांगितले. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली होती; मात्र तो बारा तासांपेक्षा अधिक काळ उपाशीपोटी असल्याने अहवाल येण्यापूर्वीच शस्त्रक्रिया करणे भाग होते, असेही त्या म्हणाल्या.
रुग्णसेवेचे भान राखत दाखविली माणुसकी
रुग्णाच्या कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी येईल. तो पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांना क्वारंटाइन व्हावे लागेल. मात्र तरीही माणुसकी आणि रुग्णसेवेचे भान राखत धोका पत्करून उपचार केल्याबद्दल डॉ. साठे व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे. लेकाचा जीव वाचविल्याबद्दल वानखेडे कुटुंबानेही डॉक्टरांचे आभार मानले.