Join us

बंद गृहप्रकल्पांना नवसंजीवनी; महारेराचा पुढाकार, कार्यपद्धतीसाठी चार गटांत विभागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:57 AM

राज्यात सध्या ५७५६ प्रकल्प बंद आहेत. यापैकी १८८२ प्रकल्पांचे काम ७० टक्के होऊनही ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. हे प्रकल्प स्वयं विनियामक संस्थांकडे नोंदणीकृत नाहीत.

मुंबई : काही कारणास्तव गृहनिर्माण प्रकल्पांचे काम अर्धवट राहिले असल्यास त्यांच्या पूर्ततेसाठी आता महारेराने पुढाकार घेतला असून, प्रकल्पांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. महारेराने त्यासाठी कार्यपद्धती ठरवून दिली आहे. महारेरा आणि स्वयं विनियामक संस्था (सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन) यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, पहिल्यांदा ७० टक्के काम पूर्ण होऊनही पूर्ण न झालेल्या १८८२ पैकी ६२४ प्रकल्पांपासून सुरुवात केली जाणार आहे. यात मुंबई महानगरातील ३०९, पुणे २२०, नागपूर २०, औरंगाबाद २९, नाशिक ४१ आणि अमरावतीमधील ५ प्रकल्पांचा समावेश आहे.

राज्यात सध्या ५७५६ प्रकल्प बंद आहेत. यापैकी १८८२ प्रकल्पांचे काम ७० टक्के होऊनही ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. हे प्रकल्प स्वयं विनियामक संस्थांकडे नोंदणीकृत नाहीत. यापैकी ६२४ प्रकल्प या संस्थांकडे नोंदणीकृत आहेत. हे प्रकल्प पुनर्जीवित करण्याच्या प्रयत्नांची सुरुवात ६२४ प्रकल्पांपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी विकासकांच्या संस्थांना ६२४ प्रकल्पांचा तपशील दिला जाईल. दरम्यान, सदस्य नसले तरी उर्वरित प्रकल्पातही मदत करण्याचे विनियामक संस्थांनी मान्य केले असून, पुढील टप्प्यात हे प्रकल्प हाती घेतले जातील.

गटांची रचना-  घर खरेदीदारांच्या हक्कांना बाधा न आणता पूर्ण होऊ शकतील, अशा प्रकल्पांचा पहिल्या गटात समावेश आहे.-  दुसरा गट ज्यात विकासक आणि घर खरेदीदार यांच्यात समेट घडवून आणण्याची गरज आहे, असा राहील.-  तिसऱ्या गटात स्थानिक प्राधिकरण किंवा बँकांच्या बाबतीत अडचणी असल्याने महारेराच्या हस्तक्षेपाची गरज असलेले प्रकल्प असतील.-  चौथ्या गटात विकासक बेपत्ता आहे आणि घर खरेदीदार विकासक बदलून प्रकल्प पूर्ण करू शकतात, अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

मध्यस्थ गटांमध्ये कोण?प्रकल्प वास्तुशास्त्रज्ञ, वित्तीय संस्था, संबंधित विकासक, गृहनिर्माण संस्था किंवा घर खरेदीदार आणि कन्सिलिएटर. 

सहा स्वयं विनियामक संस्था कोणत्या ? १) नरेडको पश्चिम फाउंडेशन२) क्रेडाई एमसीएचआय३) क्रेडाई महाराष्ट्र४) बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया५) मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन६) बृहन्मुंबई डेव्हलपर असोसिएशन]

गट काय करणार ?संबंधित विकासकांशी प्रत्यक्ष किंवा दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन प्रकल्प बंद पडण्यामागील कारणे, अडचणी समजून घेतील. प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होऊ शकेल का ? होणार असेल तर त्यासाठी काय काय करता येईल, याबाबतचा अहवाल महारेराला देतील. 

टॅग्स :मुंबई