Join us

आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; मानवी साखळीतून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 4:10 AM

मेट्रो ३च्या कारशेडसाठी रातोरात तोडलेल्या झाडांच्या विरोधात रविवारी आंदोलकांनी मानवी साखळीतून तीव्र निषेध व्यक्त केला.

मुंबई : मेट्रो ३च्या कारशेडसाठी रातोरात तोडलेल्या झाडांच्या विरोधात रविवारी आंदोलकांनी मानवी साखळीतून तीव्र निषेध व्यक्त केला. गोरेगाव पूर्वेकडील बस डेपोजवळ आंदोलकांनी मानवी साखळी करून शांततेत आंदोलन केले. या वेळी आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनात तरुणाई आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाचे कार्यकर्ते सामील झाले होते.

पोलिसांनी २३ पुरुष व ६ महिलांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. अटक केलेल्यांमध्ये विद्यार्थ्यांसह आदिवासी बांधवांचा समावेश आहे. २९ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी पोस्टरद्वारे केली. पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत ‘आरे वाचवा’चा संदेश दिला.

पर्यावरणप्रेमी संजीव शामंतुला म्हणाले की, सरकारी व महापालिका अधिकारी, मेट्रो प्रशासनाचे अधिकारी आणि पर्यावरणप्रेमी यांची एक समिती स्थापन करा. या समितीच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनाने किती झाडे तोडली याची माहिती घेऊन अहवाल सादर केला पाहिजे. आरेतील झाडे खरोखर किती तोडली गेली याचा खरा आकडा मुंबईकरांना सांगितला पाहिजे.

टॅग्स :आरेमेट्रो