नवी मुंबई : राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे दुर्गम भागात वास्तव्य करणारी गरीब कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर कायमची फेकली जातील. अशी भीती व्यक्त केली जात असून हा आदेश शासनाने तात्काळ रद्द करावा अशी मागणी आम आदमी पार्टी नवी मुंबई च्यावतीने करण्यात आली. या आदेशा विरोधात शनिवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
शिक्षण हक्क कायदयानुसार ६ ते १४ वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. परंतु २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा सरसकट बंद झाल्यास दुर्गम भागातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाईल असा आरोप यावेळी करण्यात आला. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हक्काचे असून त्यापासून त्यांना वंचित ठेवल्यास गोरगरिबांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास वाव मिळणार नसल्याची प्रतिक्रिया आम आदमी पार्टी नवी मुंबई कार्यकारी अध्यक्ष शयामभाऊ कदम यांनी व्यक्त केली.
पक्षाच्यावतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने सुरु असून शासनाने निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा कदम यांनी दिला. यावेळी पनवेलचे कार्याध्यक्ष ऍड. जयसिंग शेरे, कामोठे शहराध्यक्ष शिरीष शिंदे, ठाणे जिल्हा युवक संघटक चिन्मय गोडे, नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे, नवी मुंबई उपाध्यक्षा प्रीती शिंदेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.