नाट्य प्रयोगासाठी ऐच्छिक देणगीचे क्रांतिकारी ‘चॅलेंज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 07:04 AM2018-06-12T07:04:21+5:302018-06-12T07:04:21+5:30
व्यावसायिक रंगभूमीवर एखाद्या नाटकाचा पडदा उघडल्यानंतर ते नाटक किती चालेल, हे रसिक ठरवतात. नाटकाला लोकाश्रय मिळाला, तर त्याचे शेकडो प्रयोग रंगभूमीवर होऊ शकतात.
- राज चिंचणकर
मुंबई : व्यावसायिक रंगभूमीवर एखाद्या नाटकाचा पडदा उघडल्यानंतर ते नाटक किती चालेल, हे रसिक ठरवतात. नाटकाला लोकाश्रय मिळाला, तर त्याचे शेकडो प्रयोग रंगभूमीवर होऊ शकतात. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही, तर काही प्रयोगांतच ते नाटक विंगेत म्यान होते. क्रांतिकारकांच्या कार्यावर बेतलेल्या ‘चॅलेंज’ या नाटकाच्या बाबतीतही असेच काहीसे झाले. त्यामुळे आता नाटकाच्या चमूने प्रयोगांसाठी ऐच्छिक देणगीचे क्रांतिकारी ‘चॅलेंज’ स्वीकारले आहे.
२६ फेब्रुवारी २०१८, म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी या नाटकाचा शुभारंभ झाला होता. या नाटकात उभे केलेले क्रांतिकारकांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग झाले पाहिजेत, अशी निर्मात्यांची भावना होती. पण प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या २०-२५ प्रयोगांनंतरही वाढत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येत गेले. यासाठी काही देणगीदारांच्या साहाय्याने नाटकाचे विनामूल्य प्रयोग करावेत, असा विचारही होता. परंतु त्यानंतर ‘ऐच्छिक देणगी’ घेऊन स्वत:च प्रयोग करावेत, असा प्रस्ताव मांडण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त २७ मे रोजी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातर्फे या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. जमेल तशी मदत करण्याचे आवाहन या वेळी रसिकांना करण्यात आले. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून ‘ऐच्छिक देणगी’चा प्रयोग करण्याचे या चमूने निश्चित केले. त्यानुसार नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी नाट्यगृहात ‘ऐच्छिक देणगी’साठी एक पेटी ठेवण्यात येईल.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हे नाटक पोहोचण्यासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांच्या नाट्यगृहांतून
या नाटकाचे प्रयोग करण्याचेही ठरविण्यात आले आहे.
केवळ नाटक
नव्हे; तर मिशन...
आतापर्यंत सादर झालेल्या या नाटकाच्या प्रयोगांना कलाकारांनी मोलाची साथ दिल्यामुळे आम्ही इतके प्रयोग करू शकलो आहोत. हे केवळ एक नाटक नसून, क्रांतिकारकांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे एक मिशन आहे. यापुढे आम्ही ‘चॅलेंज’चे शेकडो प्रयोग सादर करू, अशी आम्हाला खात्री आहे.
- दिनेश पेडणेकर (निर्माता)