Join us

पोलिसाच्या घरातून रिव्हॉल्व्हरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:20 AM

पोलीस वसाहतीत घुसून पोलिसाच्या घरातूनच त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसह ३० काडतुसे आणि लाखोंचा किमती ऐवज चोरीला गेल्याची घटना डॉकयार्ड येथील पोलीस वसाहतीमध्ये घडल्याने खळबळ उडाली.

मुंबई : पोलीस वसाहतीत घुसून पोलिसाच्या घरातूनच त्याच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसह ३० काडतुसे आणि लाखोंचा किमती ऐवज चोरीला गेल्याची घटना डॉकयार्ड येथील पोलीस वसाहतीमध्ये घडल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य दहशतविरोधी विभागात (एटीएस) कार्यरत नीलेश मोहिते (४६) यांच्या घरी ही चोरी झाली. ते १९९४पासून मुंबई पोलीस दलात कार्यरत असून, २०१३पासून एटीएसमध्ये आहेत. वडिलांची तब्येत ठीक नसल्याने ते शनिवारी कुटुंबीयांसोबत गावी गेले होते. याचदरम्यान लुटारूंनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून साडे तीन लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह त्यांचे सर्विस रिव्हॉल्व्हर आणि ३० जिवंत काडतुसे लंपास केली. रविवारी ते घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घाटकोपर पोलिसांसह गुन्हे शाखाही चोरीचा तपास करत आहे.