बक्षिशीसाठी मुलगा झाल्याची आरोळी! हव्यासापोटी खोटी माहिती; नातेवाईक द्विधा अवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:32 AM2018-03-24T01:32:01+5:302018-03-24T01:32:01+5:30
बक्षिशीच्या हव्यासापोटी मुलीऐवजी मुलगा झाल्याची खोटी माहिती आयांनी नातेवाईकांना दिल्याचा प्रकार शताब्दी रुग्णालयात घडला. मात्र, त्यामुळे नातेवाईकांची द्विधा मनस्थिती झाली असून आई आणि बाळाची डीएनए चाचणी करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
मुंबई : बक्षिशीच्या हव्यासापोटी मुलीऐवजी मुलगा झाल्याची खोटी माहिती आयांनी नातेवाईकांना दिल्याचा प्रकार शताब्दी रुग्णालयात घडला. मात्र, त्यामुळे नातेवाईकांची द्विधा मनस्थिती झाली असून आई आणि बाळाची डीएनए चाचणी करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
सोनी नावाच्या एका महिलेची प्रसूती शुक्रवारी साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. मात्र, या दरम्यान, बाळाने आईच्या पोटात ‘शी’ केल्याने मुलगा झाला की मुलगी हे सांगायला येण्यास डॉक्टर आणि परिचारिकांना उशीर झाला. त्याच दरम्यान दोन आयाबाई आॅपरेशन थिएटरमधून बाहेर पडल्या आणि बाहेर असलेल्या सोनीच्या नातेवाइकांना त्यांनी ‘आपको बच्चा (लडका) हुवा है, मुबारक हो,’ असे सांगितले. मुलगा झाल्याचे समजताच, सोनीच्या नातेवाइकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि दोन हजार रुपये काढत त्यांनी आयाच्या हातावर ठेवले. दोघी निघून गेल्यानंतर एक परिचारिका बाहेर आली. ‘बाळाने आईच्या पोटात शी केल्याने बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागेल,’ असे तिने सांगितले. नातेवाईक बाळाला पाहण्यासाठी सोनीजवळ गेले आणि मुलाच्या जागी मुलगी पाहून त्यांनी रुग्णालयात हंगामा केला.
‘रुग्णालयात आमचे बाळ बदलले. मुलाच्या जागी आम्हाला मुलगी देत आहेत,’ असे आरोप त्यांनी केले. त्यामुळे शताब्दी रुग्णालयाचे अधिष्ठाता आंग्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कांदिवली पोलिसांनाही तेथे बोलावण्यात आले. तेव्हा आंग्रे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सीसीटीव्ही पडताळून पाहिले, तसेच रुग्णालयाचे मस्टरही तपासण्यास आले. त्यात सोनीला मुलगी झाल्याचे उघड झाले.
‘मुलगा झाल्याचे तुम्हाला कोणी सांगितले?’ असे पोलिसांनी सोनी कुटुंबाला विचारले, तेव्हा त्यांनी आयाबाईचे नाव घेतले. त्यामुळे आंग्रे यांनी दोन्ही आयांना बोलावल्यानंतर बक्षिसीसाठी खोटे बोलल्याचे त्यांनी कबूल करत माफी मागितली. सोनीच्या कुटुंबीयांनीदेखील ती मुलगी त्यांचीच असल्याचे मान्य केले. मात्र आता संशय दूर करण्यासाठी आई-बाळाची डीएनए चाचणी होणार आहे.
पालकांच्या मनातील संशय दूर करणार
आम्ही बाळ आणि आईची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्याच्या पालकांच्या मनातील संशय दूर होईल, तसेच आया विरोधातही तक्रार दाखल करण्याचा आम्ही विचार करत आहोत.
- ए. आंग्रे, अधिष्ठाता, शताब्दी रुग्णालय
योग्य ती कारवाई होईल
आम्ही या प्रकरणी चौकशी करत आहोत, तसेच संबंधित आयाविरोधातही योग्य ती कारवाई केली जाईल.
- मुकुंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदिवली पोलीस ठाणे